38.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रबिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा

बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा

अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावले उचलावीत. यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल,असे चव्हाण म्हणाले.

बिहारमधील जातीआधारित आरक्षण ५० टक्क्यांवरून ६५ टक्के करण्यात आले आहे. या संदर्भातील विधेयक गुरूवारी बिहार विधानसभेत एकमताने मंजूर झाले. आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या १० टक्के आरक्षणासह बिहारमधील आरक्षण आता ७५ टक्क्यांवर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी राज्यातील मराठा आरक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला आहे. चव्हाण म्हणाले की, जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? बिहारच्या या विधेयकाला तेथील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. देशात जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाने अगोदरच स्वीकारली आहे. हैदराबाद आणि नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत तसे ठरावही मंजूर करण्यात आले आहेत. याकडे लक्ष वेधून राज्य सरकारने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे .

जातनिहाय जनगणना आवश्यक : विजय वडेट्टीवार
राज्यातील विविध समाजांचे आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची आहे. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी. आरक्षणाची मर्यादा वाढल्यास आरक्षणाबाबत असलेले सर्व प्रश्न सुटतील. आगामी अधिवेशनात राज्य सरकारने या बाबत कारवाई सुरू करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवरून केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR