मुंबई : प्रतिनिधी
नवनीत राणा यांना महायुतीतूनच विरोध असताना अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने त्यांनाच उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपसह शिवसेनेचे आनंदराव आडसूळ आणि प्रहारचे बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कडू यांनी त्यांनी उमेदवारी देऊन त्यांचे काम केले. आता आम्ही आमचे काम करू, असा इशारा दिला. नाशिकच्या जागेवरूनही महायुतीत धुसफूस आहे आणि साता-याची जागा भाजपला सुटल्याने अजित पवार गटात खदखद वाढली असून, वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी थेट नाराजी बोलून दाखविली. तसेच माढ्यातही राष्ट्रवादीत असंतोष आहे.
नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली असून, त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. परंतु मुळात त्यांच्या उमेदवारीला भाजपसह शिवसेना आणि आमदार बच्चू कडू यांचा विरोध असताना आणि त्यांच्यावर जात प्रमाणपत्राची टांगती तलवार असताना उमेदवारी मिळाल्याने महायुतीत असंतोष वाढला आहे. नाशिकमध्येही शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार असताना तेथे भाजप आणि राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. असे असताना येथेही साता-याच्या बदल्यात राष्ट्रवादीला जागा देण्याच्या हालचाली आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे माढ्यातही राष्ट्रवादीत असंतोष असताना साता-यात उदयनराजेंना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते नाराज झाले असून, वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी थेट अजित पवार यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महायुतीतील ही खदखद महागात पडणार असल्याचे बोलले जात आहे.
नाशिकच्या जागेवरून दावे-प्रतिदावे
सातारा आणि नाशिकच्या जागेवरील महायुतीतील तिढा अखेर सुटला असून साता-यात उदयनराजे भोसले तर नाशिकमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ लोकसभेच्या रिंगणात असतील, असे सांगितले जात आहे. परंतु तेथे शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे प्रमुख दावेदार आहेत.