24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeपरभणीमहायुतीचे उमेदवार महादेव जानकर निघाले करोडपती

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर निघाले करोडपती

परभणी : प्रतिनिधी
महायुतीच्या वतीने परभणी लोकसभेसाठी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रासपचे जानकर यांनी दि. १ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना फकिराची उपमा दिली होती. परंतु जानकर यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ते फकीर नव्हे तर करोडपती असल्याचे समोर आले आहे.

महादेव जानकर मूळचे पळसवाडी (जिल्हा सातारा) येथील रहिवासी असून त्यांनी वालचंद कॉलेज, सांगली येथून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची डिग्री पूर्ण केली आहे. त्यांनी दिलेल्या शपथपत्रात आपला व्यवसाय शेती हा दर्शवला आहे. त्यांच्या नावावर १८ एकर १४ गुंठे एवढी शेती असून त्यांच्याकडे चल आणि अचल दोन्ही मिळून जवळपास ५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती शपथपत्रात नमूद करण्यात आली आहे.

त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी फकीर अशी उपमा दिलेल्या जानकर यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
जानकर यांनी निवडणूक अर्ज भरताना २०२२-२३ चे उत्पन्न ४० लाख १९ हजार ९९० एवढे असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे चलसंपत्ती १ कोटी २५ लाख, १० हजार ५९८ रुपये एवढी आहे. यामध्ये कॅश इन हॅण्ड २७ हजार ३३० रुपये आहेत. तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५१ लाख ६६ हजार ७७९ रुपयांची एफडीआर आहे. त्याचबरोबर गोल्ड बाँड स्कीममध्ये ७९१ ग्रॅम सोन्यात गुंतवणूक केली असून त्याचे मूल्य २९ लाख ९६ हजार ३००८ रुपये एवढे आहे. याशिवाय त्यांनी पीपीएफ खात्यात २०१९-२० साठी दीड लाख रुपये, तर मार्च २०२४ मध्ये २ लाख २५ हजार ८४५ रुपये आहेत. जानकरांकडे २०० ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने असून त्याचे बाजारमूल्य १३ लाख ६५ हजार इतके आहे. सर्व अचल संपत्ती १ कोटी २५ लाख १० हजार ५९८ रुपये आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे अचल संपत्ती ३ कोटी ६२ लाख ९९ हजार ७६० रुपये इतक्या किमतीची असल्याचे त्यांनी आपल्या घोषणापत्रात सांगितले आहे. यामध्ये जानकर यांच्याकडे शेतजमीन, रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी आणि कमर्शियल प्रॉपर्टी याचा समावेश आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR