34.2 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रयुतीचा गड भेदणार?, बुलडाण्यात तिरंगी लढत

युतीचा गड भेदणार?, बुलडाण्यात तिरंगी लढत

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात मागच्या ३ टर्मपासून शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेच्या दोन गटांतच लढत होत आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने जि. प. चे माजी अध्यक्ष नरेंद्र खेडेकर यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे येथे चुरस पाहायला मिळणार आहे. परंतु महाविकास आघाडीच्या तुलनेत युतीचा गड मजबूत आहे.

त्यामुळे हा गड खेडेकर कसे भेदतात, हे पाहावे लागेल. यातच शेतकरी नेते रविंकात तुपकर यांच्या रूपाने तिसरा भिडूही मैदानात उतरला आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत बंडखोरी, शेतकरी प्रश्न गाजणार आहेत. यात कोणाचा मुद्दा कितपत भावतो, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. परंतु येथे चुरशीची लढत होणार, हे नक्की.

बुलडाणा जिल्ह्याचे घाटाखाली आणि घाटावर असे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग आहेत. मराठवाड्याला लागून असलेल्या देऊळगाव राजापासून सातपुड्यालगतच्या जळगाव जामोदपर्यंत जिल्ह्यातील दोन टोके जोडणारा हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. कारण मागील २५ वर्षांपासून येथे शिवसेनेचीच सत्ता आहे. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतापराव जाधव चौथ्यांदा आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरोधात नरेंद्र खेडेकर शड्डू ठोकून तयार आहेत. सध्या जिल्ह्यातील खासदार आणि दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. मात्र, सच्चे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असे बोलले जाते. या लढतीत राष्ट्रवादीची भूमिकादेखील महत्त्वाची ठरणार आहे. परंतु राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. त्यामुळे एकीकडे महायुती आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मजबुतीने तयारी करण्यात येत आहे.

मतदारसंघातील सर्व आमदार महायुतीचे
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात बुलडाणा, सिंदखेडराजा, चिखली, मेहकर, खामगाव व जळगाव जामोद हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये चिखली, खामगाव आणि जळगाव जामोद हे तीन मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. मेहकर आणि बुलडाणा हे मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे कागदोपत्री महायुती प्रबळ आहे. त्यामुळे येथे जनतेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या मतदारसंघात नेहमीच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झालेली आहे. यात प्रत्येकवेळा शिवसेनेने बाजी मारली. परंतु यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत. परंतु या मतदारसंघात विधानसभेच्या सहाही मतदारसंघांत युतीचे आमदार असल्याने हा मजबूत गड भेदणे विरोधकांसाठी आव्हान असणार आहे. परंतु खासदार प्रतापराव जाधव यांच्याविषयी वाढलेली नाराजी आणि तेच ते उमेदवार यामुळे जनता पर्याय निवडते का, हे पाहावे लागेल. ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांच्यासोबतच शेतकरी चळवळीतील नेते रविकांत तुपकर मैदानात उतरले आहेत. त्यामुळे त्यांचा तिसरा पर्याय ठरू शकतो.

मराठा आरक्षणासह विविध मुद्दे गाजणार
यावेळी मराठा आरक्षण हा विषयही प्रचारात राहील. यासोबतच रखडलेला खामगाव-जालना रेल्वेमार्ग, जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये उद्योगांची कमतरता, सिंदखेडराजा विकास आराखड्यातील संथगतीने होणारी कामे, जिगाव प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रकर्षाने निवडणुकीच्या प्रचारात चर्चेत येतील. ही निवडणूक या मुद्याभोवती फिरेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR