31.3 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रकुठे पाठिंबा, कुठे विरोध; भूमिका अनाकलनीय

कुठे पाठिंबा, कुठे विरोध; भूमिका अनाकलनीय

मुंबई : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीवर तुटून पडत आहेत. त्यामुळे त्यांची भाजपविरोधी भूमिका महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडेल आणि वंचितच्या साथीने महायुतीला धक्का देता येईल, असे गणित होते. सद्य स्थितीत तसे जुळवून घेतले असते, तर कदाचित मोठी उलथापालथ शक्य होती. परंतु सुरुवातीला जुळवून घेण्याची भाषा आणि नंतर परस्परविरोधी विधाने यामुळे साशंकता वाढली.

मात्र, तरीही महाविकास आघाडीतील नेत्यांनी सावध पवित्रा घेतला. परंतु अखेर जे व्हायचे तेच झाले. कारण शेवटपर्यंत सूर जुळलेच नाहीत.
अ‍ॅड. आंबेडकर यांनी सुरुवातीला महाविकास आघाडीला बगल देताना मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांना आणि ओबीसी बहुजन आघाडीचे प्रकाश शेंडगे यांना सोबत घेऊन एक नवी आघाडी करण्याची योजना आखली. परंतु भविष्यातील धोके ओळखून जरांगे पाटील यांनी ऐनवेळी सावध भूमिका घेतली. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकर यांची तिस-या आघाडीची योजना बारगळली. महाविकास आघाडीला न जुमानता त्यांनी एकानंतर एक उमेदवार घोषित केली. त्यामुळे ब-याच ठिकाणी आघाडी घेणा-या उमेदवारांची कोंडी झाली.

पण सुरुवातीला पहिली यादी जाहीर करताना अ‍ॅड. आंबेडकर यांनी काँग्रेसला जुळवून घेण्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या ७ उमेदवारांंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्यातून त्यांनी आम्ही काँग्रेससोबत जुळवून घ्यायला तयार आहोत, असा संदेश देताना काँग्रेसची थेट कोंडी करण्याची भूमिका घेतली. विशेष म्हणजे त्यांनी सर्वप्रथम काँग्रेसचे कोल्हापूरचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनाही पाठिंबा जाहीर केला. मात्र, अन्यत्र त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार द्यायला सुरुवात केली.
मविआच्या विरोधात यासाठी म्हणायचे की, वंचितच्या उमेदवाराचा धोका भाजपच्या उमेदवाराला नाही, तर महाविकास आघाडीला असतो, याची प्रचिती २०१९ च्या निवडणुकीत आली.

तुला ना मला….
एकीकडे आघाडीच्या काही उमेदवारांना पाठिंबा देतानाच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना थेट भाजपचे हस्तक म्हणून हिणवले, तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्यावर पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप केला. या मुळे काँग्रेस नेते नाना पटोले नाराज झाले. यातून पटोले यांनी पाठिंबा द्यायचा असेल, तर महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे सांगतानाच अकोल्यातून काँग्रेस उमेदवार उतरविण्याची घोषणा केली आणि डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे तुला ना मला… अशी स्थिती आहे.

सुप्रिया सुळेंनाही पाठिंबा
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात ब-याच ठिकाणी उमेदवार उतरविण्याचा धडाका लावलेला असताना काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराज आणि विकास ठाकरे यांना पाठिंबा दर्शवितानाच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनाही त्यांनी पाठिंबा जाहीर केला. महाविकास आघाडीशी या पद्धतीने जुळवून घ्यायचे होते, तर मग इतरत्र उमेदवार देऊन अ‍ॅड. आंबेडकर यांना नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR