24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्र‘भावना’ संपल्या; वाशिम-यवतमाळमध्ये दुहेरी लढत

‘भावना’ संपल्या; वाशिम-यवतमाळमध्ये दुहेरी लढत

वाशिम : वंचितने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार बदलले असून दि. ५ एप्रिल रोजी छाननीवेळी यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. वंचितने आतापर्यंत १९ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सुभाष खेमसिंग पवार या उमेदवाराला बदलून अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे. त्यातच सतत ५ वेळेसच्या खासदार भावना गवळी यांना महायुतीने तथा शिंदे गटाकडून तिकीट न मिळाल्याने अनेक शंका-कुशंकांना विराम मिळाला आहे. दरम्यान भावना गवळी यांनी बंडखोरी न करता अपक्षही अर्ज न भरल्याने वाशिम-यवतमाळ लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष लढत आता महायुतीच्या राजश्री पाटील आणि महाआघाडीचे संजय देशमुख यांच्यात रंगणार आहे. दरम्यान वंचितचा अर्ज बाद झाल्यानेही तिहेरीचा धोका संपला आहे.

शुक्रवारी अर्ज छाननीला सुरुवात झाली होती. यावेळी वंचितचे राठोड यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या होत्या. यामुळे राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची ४ एप्रिल ही अखेरची तारीख होती. त्याच्या काही दिवस आधीच वंचितने अचानकपणे उमेदवारी बदलून राठोड यांना दिली होती. यामुळे राठोड यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

या मतदारसंघातून काल सायंकाळपर्यंत ३८ उमेदवारांचे ४९ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारपासून या अर्जांची छाननी सुरु झाली आहे. महायुतीतून राजश्री पाटील तर महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितने उमेदवार दिल्याने या ठिकाणी चुरशीची आणि तिरंगी लढत पहायला मिळेल अशी चर्चा होती. परंतु आता वंचितला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारच बाद झाल्याने वंचितचे या मतदारसंघातील आव्हान संपुष्टात आले आहे. यामुळे वंचित आता कोणाला पांिठबा देते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

बदललेले तीन उमेदवार
रामटेकच्या उमेदवाराने तांत्रिक कारण सांगत माघार घेत काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पांिठबा जाहीर केला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात अभिजित राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर परभणीतून प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली होती. परंतु उगलेंची उमेदवारी बदलून वंचितने हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR