ठाणे : मोहोळचा ‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान सिकंदर शेख याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केल्याची माहिती शिवसेना (शिंदे गटा)चे जिल्हाप्रमुख चरण राज चवरे यांनी दिली.
गेल्या आठवड्यात पुण्या जवळील पुलगाव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध सिकंदर शेख अशी लढत झाली. अवघ्या २३ सेकंदात आक्रमक कुस्ती करून पैलवान राक्षे याच्यावर ‘झोळी’ डावाने मात करून पैलवान शेख याने अत्यंत मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा बहुमान पटकाविला. यामुळे मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे नाव देशभर पोहोचले.
यापूर्वी पैलवान शेख याने प्रयत्न करूनही महाराष्ट्र केसरी पासून त्याला दोन वेळा हुलकावणी बसली होती. मात्र तिस-या प्रयत्नात त्याला यश प्राप्त झाले. यावेळी जिल्हाप्रमुख चवरे यांच्यासह उद्योजक राजू खरे, पेनुर ग्रामपंचायत सदस्य सज्जु शेख, पैलवान बाळासाहेब चवरे, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.