30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रटीका करणारे आज सोबत, ही देवाचीच किमया

टीका करणारे आज सोबत, ही देवाचीच किमया

धारूर : नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधान होणारच आहेत. तथापि, जिल्ह्यातील दहा हजार युवकांना रोजगार मिळेल, असा एखादा मोठा उद्योग पंतप्रधानांकडून हट्टाने जिल्ह्यात घेऊन यायचा आहे. कॅन्सर रुग्णांसाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करायचे आहे. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आपण काम करणार, पालकमंत्रिपदाच्या काळात खूप संघर्ष झाला, त्यावेळेस जे टीका करायचे आज ते सोबत आहेत ही देवाचीच किमया असल्याचे भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांनी सांगितले. धारूर येथे आयोजित धनगर समाज बांधवांच्या मेळाव्यात पंकजा बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी माझ्या आदर्श आहेत. आयुष्यात त्यांच्या वाट्याला खूप संघर्ष आला, पण सात्विकता न सोडता त्यांनी समाजाची सेवा केली. माझ्याही वाट्याला तसाच संघर्ष आला, शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा करायची, पण सात्त्विकता ढळू द्यायची नाही हे मी राजकारणात ठरवले आहे. मी निवडणुकीत उभी आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सोशल इंजिनिअरिंग दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे करायचे, तसाच प्रयत्न माझाही आहे.

पालकमंत्रिपदाच्या काळात खूप संघर्ष झाला, त्यावेळेस जे टीका करायचे आज ते सोबत आहेत ही देवाचीच किमया आहे. मी त्याकाळात राबविलेली प्रत्येक योजना गोरगरीब, सर्वसामान्य घटकांना न्याय देणारी होती. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत पोचवली. जलयुक्त शिवारचे मोठे काम केले. अहिल्यादेवींच्या नावाने सामाजिक सभागृह बांधले. विकास करताना कुठलाही भेदभाव केला नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

कुठलेच मुद्दे नसले की निवडणूक जातीवर जाते. आता आरक्षणाचा मुद्दा निर्माण झालाय. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे, ते नक्की पूर्ण करतील. पण ही निवडणूक संसदेची आहे आणि तो विषय राज्याच्या सभागृहाचा आहे. मराठा समाजाला टिकणार आणि संविधानात बसणारे आरक्षण मिळाले पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR