30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रखैरे-दानवेंनी दुस-यांदा भरवला एकमेकांना पेढा

खैरे-दानवेंनी दुस-यांदा भरवला एकमेकांना पेढा

छ. संभाजीनगर : जिल्ह्याच्या राजकारणात कायम एकमेकांना पाण्यात पाहणारे शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) नेते, लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना महिनाभरात दुस-यांदा एकमेकांना पेढा भरवण्याची संधी मिळाली. दोन आठवड्यापुर्वी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी खैरे यांना जाहीर झाली. तेव्हा नाराज असलेल्या दानवेंनी खैरे यांच्या घरी जाऊन त्यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल शुभेच्छा देत पेढा भरवला होता.

या भेटीची चर्चा तेव्हा जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या राजकारणात चवीने सुरू होती.
उमेदवारी मिळाल्याबद्दल पक्षातील कट्टर विरोधकाने भरवलेल्या पेढ्याची गोडी अजून संपत नाही, तोच खैरे-दानवे यांना पुन्हा ऐकमेकांना पेढा भरवण्याचा योग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयाने आला. तो निर्णय म्हणजे अंबादास दानवे यांची शिवसेना नेतेपदी झालेली बढती. दानवे यांच्यासाठी शिवसेनेतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते.

चंद्रकांत खैर यांना दानवेंचा विरोध डावलून देण्यात आलेली उमेदवारी म्हणजे शेवटची संधी आहे, हे दानवे यांच्या नेतेपदी झालेल्या नियुक्तीवरून स्पष्ट झाले आहे. आता जिल्हा आणि मराठवाड्याच्या राजकारणात अंबादास दानवे हेच दादा असणार हेही उद्धव ठाकरे यांनी या नियुक्तीच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. काल मुंबईत शिवसेना नेतेपदी नियुक्ती केल्याबद्दल अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.

त्यानंतर आज सकाळी सहा वाजता दानवे यांचे संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी दानवे समर्थकांनी केली होती. विमानतळापासून क्रांती चौकापर्यंत वाहन रॅलीचे आयोजन आणि सत्कार असा कार्यक्रम होणार होता. परंतु अचानक तो रद्द करण्यात आला. त्यामुळे सकाळी विमानतळावर शिवसेनेच्या पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व शिवसैनिकांच्या स्वागताचा स्वीकार करत दानवे यांनी थेट चंद्रकांत खैरे यांचे डेक्कन येथील निवासस्थान गाठले.

राजकारणात मी दानवेंचा गुरू आणि ते माझे शिष्य असल्याचे खैरे वारंवार सांगतात. शिवसेना नेते पदावर निवड झाल्यानंतर दानवे यांनीही खैरे यांना गुरू मानत त्यांची भेट घेतली आणि पुढील कार्यासाठी आशिर्वादही मागितला. दोघांनी एकमेकांना आलिंगन देत शाल, पुष्पगुच्छ देत पेढा भरवला. हे दृश्य पाहणा-या दोघांच्याही समर्थकांना आनंद झाला नसेल तर नवलच.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR