19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरसांगोला मतदारसंघ माढा लोकसभेसाठी निर्णायक

सांगोला मतदारसंघ माढा लोकसभेसाठी निर्णायक

सोलापूर : रणजित जोशी
सांगोला विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभेसाठी महत्त्वपूर्ण असून या मतदारसंघातील मतदानावर लोकसभेची गणिते अवलंबून आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर लोकसभेच्या झालेल्या तीन निवडणुकांपैकी दोन निवडणुकांमध्ये सांगोल्यातून शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख, आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हे दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहिले, तर २०१९ च्या निवडणुकीत स्व. गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे दोन नेते राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्या सोबत होते.

आमदार शहाजी पाटील हे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सोबत होते. सांगोल्यातील राजकीय परिस्थिती पाहता यापूर्वी लोकसभेला शेकापने भाजपलाच मदत केली आहे. यंदा मात्र लोकसभेला शेकापकडून भाजपला सहकार्य मिळणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हे दोन नेते भाजप महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या सोबत आहेत, तर शेकापकडून स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख हे दोघेजण, शरद पवार गटाचे बाबुराव गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमाला गायकवाड, काँग्रेसचे प्रा. पी. सी. झपके, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांसोबत असणार, असे सांगोल्यातील राजकीय समीकरण आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा सन २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध भाजपचे सुभाष देशमुख, रासपचे महादेव जानकर अशी तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी सांगोल्याचे शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख, आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हे तिन्ही दिग्गज नेते शरद पवार यांच्यासोबत होते, त्यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शरद पवार यांना सुमारे ९९ हजार मते मिळाली होती, भाजपचे सुभाष देशमुख यांना ३२ हजार मते, तर रासपचे महादेव जानकर यांना ३० हजार मते मिळाली होती. पुन्हा सन २०१४ साली राष्ट्रवादीकडून माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटील, भाजप, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्यात दुरंगी लढत झाली होती. त्यावेळीही स्व. गणपतराव देशमुख, आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हे दिग्गज नेते विजय मोहिते-पाटलांसोबत असतानाही सांगोल्यातून सदाभाऊ खोत यांना निर्णायक १६,५०० मताधिक्य मिळाले होते.

त्यानंतर २०१९ ला भाजप-शिवसेना युतीकडून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर, राष्ट्रवादीकडून आ. संजय शिंदे यांच्यात दुरंगी लढत झाली. त्या निवडणुकीतही स्व. गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हे संजय शिंदे यांच्यासोबत, तर विद्यमान आमदार शहाजी पाटील हे खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबत राहिले. त्या निवडणुकीत सांगोल्यातून भाजपला ७८,७४६ मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीला ८२,१२० मते मिळून मताधिक्य मिळाले होते, शिवसेना आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हे रणजितसिंह निंबाळकर यांच्या सोबत आहेत, तर शेकापचे डॉ. अनिकेत व बाबासाहेब देशमुख, काँग्रेस (आय), उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, मित्रपक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासोबत असले तरी स्व. गणपतराव देशमुख व शरद पवार यांच्यातील सख्य पाहता दोन्ही डॉक्टर बंधूंना धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मागे ताकद लावावी लागणार आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बदललेली असून, शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख यांच्याविना लोकसभेची निवडणूक होत आहे. शिवसेना आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हे रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबत आहेत, तर शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख या बंधूंना सांगोला तालुक्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता शरद पवार यांच्याबरोबर जाणेच फायद्याचे ठरणार असल्याची चर्चा रंगत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR