नवी दिल्ली : १५ दिवसांपासून सुरू असलेल्या तुफानी प्रचाराची सांगता गुरुवार दि. १६ नोव्हेंबर ोजी मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये झाली. या दोन्ही राज्यांमध्ये शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
मध्य प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात २३० विधानसभा मतदारसंघांमध्ये तर छत्तीसगडमध्ये दुस-या टप्प्यात उर्वरित ७० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल. छत्तीसगडच्या ९० सदस्यीय विधानसभेसाठी २० मतदारसंघांमध्ये गेल्या ७ नोव्हेंबरला मतदान पार पडले आहे. या दोन्ही राज्यांत भाजप व काँग्रेस हेच दोन्ही पक्ष प्रामुख्याने आमनेसामने आहेत. मध्य प्रदेशमध्ये भाजप तर छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तारूढ आहे. गेल्या १८ वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये असलेली शिवराजसिंह चौहान यांची राजवट बदलण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे तर भाजपकडून डबल इंजिनचे सरकार मध्य प्रदेशसाठी कसे उपयुक्त आहे याचा पाढा वाचला जात आहे.
दोन्ही राज्यांमध्ये दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन व निवडणुकीत प्रचार केला. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय भूपृष्ठमंत्री वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी शिवराजसिंह चौहान यांच्यासाठी प्रचार केला.