मुंबई : राज्यातील प्रवाशांची ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणा-या एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. गेल्या १५ दिवसात एसटी महामंडळाने तब्बल ३३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हंगामी दरवाढ करूनही अनेक प्रवाशांनी एसटी बसलाच पसंती दिली आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अजूनही या कमाईत मोठी वाढ होऊ शकते, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर एसटीच्या कर्मचा-यांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते.
त्यातच मराठा आंदोलनाचा फटकाही एसटीला बसला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी बसेसची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे काही दिवस एसटी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. मात्र, दिवाळीत एसटीने मोठी कमाई केली आहे.
एसटीवर आलेलं आर्थिक संकट पाहता काही दिवसांपूर्वी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सूत्रानुसार यंदाच्या दिवाळीच्या हंगामात सर्व गाड्यांच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ होती. मात्र, भाडेवाढ होऊनही अनेक प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करण्यास पसंती दिली.
भाऊबीजेच्या दिवशी विक्रमी उत्पन्न
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत एसटीला राज्यभरातून ३२८ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे यातील ३१ कोटी ६० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न भाऊबीजेच्या दिवशी मिळाले आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे