कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका बांगलादेशी खासदाराची हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या खासदाराचे नाव अन्वारुल अझीम असे आहे. मात्र पोलिसांना अद्याप अन्वारुल यांचा मृतदेह हाती लागला नाही. बांगलादेशच्या खासदाराची कोलकात्याच्या न्यू टाऊन भागात एका उंच इमारतीतील फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार रहात असलेल्या फ्लॅटमध्ये रक्ताचे डागही आढळून आले आहेत. मात्र, अद्याप मृतदेह हाती लागलेला नाही. पोलिस मृतदेहाचा शोध घेत आहेत. या प्रकरणी बांगलादेशातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांनी खून करून बांगलादेशात पलायन केल्याचा संशय आहे. मात्र, या घटनेची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
याप्रकरणी बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमन खान कमाल यांचे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, भारतीय पोलिसांनी आज सकाळी बांगलादेश पोलिसांना खासदार अन्वारुल अझीम यांची हत्या झाल्याची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार अन्वारुल अझीम हे १२ मे रोजी उपचारासाठी भारतात आले होते, मात्र दोन दिवसांनी ते बेपत्ता झाले. बांगलादेश सरकारनेही आपल्या खासदाराचा शोध घेण्यासाठी भारत सरकारकडे मदत मागितली होती. या प्रकरणात बंगालमधील सोन्याचे तस्कर आणि गुंडांची भूमिका असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.