नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाला आता वर्ष झाले आहे. पण या खटल्यात सध्या काय सुरु आहे, याबाबत आपल्याकडं कुठलीही अपडेट नाही, असे पीडित वालकर कुटुंबाने म्हटले आहे. श्रद्धाच्या वडिलांनी या प्रकरणाच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे.
श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी म्हटले की, श्रद्धा गेल्यानंतर आम्ही अद्याप तिचे कुठलेही अंत्यसंस्कार केलेले नाहीत किंवा पुजा केलेली नाही. अंत्यसंस्कारांसाठी श्रद्धांच्या शरिराचे अवशेष पोलिसांकडून मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण ते अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे ही केस थंडावल्याचे दिसून येत आहे. श्रद्धाचा मारेकरी तिचा मित्र अफताब पुनावाला याच्याविरोधातील पुराव्यांबाबत बोलताना तिचे वडील म्हणाले, माझी मुलगी गोड आणि महत्वाकांक्षी होती जिचा या नराधमाने खून केला.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मला या केसच्या अपडेटबाबत पोलिसांकडून आणि कोर्टाकडून कुठलाही फोन आलेला नाही. दरम्यान, श्रद्धा जेव्हा जीवंत होती तेव्हा मी तिच्याशी योग्य संवाद साधू शकलो नाही याचं वाईट वाटतं, असंही आता विकास वालकर यांनी म्हटलं आहे. मी या केसबाबत बराच विचार करतो आहे पण आता पुढे काय करायचं हे मला खरंच कळत नाहीए. मी गेल्या अनेक महिन्यांपासून जिथे हे हत्याकांड घडले त्या दिल्लीला गेलेलो नाही.