23.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रकुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांची उचलबांगडी

कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांची उचलबांगडी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या सांगण्यावरून बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवार यांची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची नुकतीच बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्याने अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याने त्याचा वचपा काढत मोठे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र युगेंद्र पवार यांची कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्याची चर्चा सध्या बारामती येथे सुरू आहे.

युगेंद्र पवार यांनी आपल्याला या निर्णयाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. अध्यक्षपदावरून हटवण्याच्या बाबतीत मला अधिकृत अद्याप काही कळवण्यात आलेले नाही किंवा मला तसे काही पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र, कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये काहीतरी निर्णय झाल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच युगेंद्र पवार यांची बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

बारामती लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी माळेगाव येथील अजित पवारांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी अजितदादा घरात नव्हते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची भेट घेतली होती. या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी लोकसभा प्रचारादरम्यान पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता अजित पवार यांनी युगेंद्र पवारांना कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवल्याने हा वाद चिघळणार का, हे पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR