27.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeसोलापूरप्रणिती शिंदेंच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये भालके समर्थकांचा राडा

प्रणिती शिंदेंच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये भालके समर्थकांचा राडा

पंढरपूर : खासदार प्रणिती शिंदे यांच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये भगीरथ भालके यांच्या समर्थकांनी पंढरपुरात मोठा राडा केला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोरच भगीरथ भालके समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचा बॅनरवरती फोटो नसल्यामुळे भालके समर्थक आक्रमक झाले. बॅनरवरती स्व. भारत नाना भालके व भगीरथ भालके त्यांचा फोटो नसल्यामुळे भालके समर्थकांनी नाराज होऊन जोरदार घोषणाबाजी केली.

सोलापूर लोकसभेतून प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांचा तब्बल ७५ हजार मतांनी पराभव करून संसदेत पाऊल ठेवले. त्यांच्या विजयात मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील मताधिक्य हे निर्णायक ठरले आहे. निवडणूक झाल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता.

अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील कृतज्ञता मेळावा संपन्न झाल्यानंतर गुरुवारी पंढरपूर येथे दाते मंगल कार्यालय या ठिकाणी प्रणिती शिंदे यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या ठिकाणी बॅनरवरती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे स्व. आमदार भारतनाना भालके यांचा फोटो नसल्यामुळे भालके समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून आले. बॅनरवर स्व. भारत नाना भालके आणि भगीरथ भालके यांचे फोटो नसल्यामुळे भालके समर्थक नाराज झाले. त्यांनी सभागृहातून बाहेर येत, जोपर्यंत स्वर्गीय आ. भारतनानांचा फोटो बॅनरवरती लावला जात नाही तोपर्यंत सभागृहांमध्ये येणार नाही, असा पवित्र घेतला होता. तेव्हा स्थानिक आयोजकांनी भारतनाना भालके यांचा एक फोटो आणून डिजिटल बॅनरवरती लावला.

मेळाव्याच्या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे यांचे आगमन होताच त्यांच्यासमोर भालके समर्थकांनी भगीरथ भालके आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्याने वातावरण तणावाचे बनले होते. सभेच्या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे आल्यानंतर त्यांनी व भगीरथ भालके यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून झाल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भगीरथ भालके यांनी मनोगत व्यक्त करत असताना झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली मात्र स्थानिक पदाधिका-यांनी अशा प्रकारच्या चुका करू नयेत असा सल्लाही भालके यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR