मुंबई : पीए मोदी म्हणजे पनौती मोदी आहेत, भारतीय टीम चांगले खेळत होती, पण हे पनौती तिकडे गेले आणि आपल्या टीमला हरवले अशी जळजळीत टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. ते राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत होते.
नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेट्सने हरवले. पूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करूनसुद्धा अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेला सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्यावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, पीए मोदी म्हणजे पनौती मोदी, ते सामना पाहायला गेले आणि भारतीय संघ हरला. आपला संघ चांगली कामगिरी करत होता, पण पनौती तिकडे गेले आणि भारतीय संघाला हरवले.
उद्योगपतींचे १४ लाख कोटी रुपये माफ
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, ते नुसता लोकांना भुलवतात. कधी इकडे नेतात तर कधी तिकडे नेतात. त्यांच्या धोरणाचा फायदा देशातल्या काही उद्योगपतींनाच झाला आहे. गेल्या नऊ वर्षाच्या कालावधीत मोदींनी देशातल्या दहा ते पंधरा उद्योगपतींचे १४ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. आता त्या उद्योगपतींमध्ये कोण गरीब होते? कोण मागासलेले होते?
जातीय जनगणनेची मागणी
जातीय जनगणनेवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी संसदेत बोलताना जातीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारने मागासवर्गियांसाठी काम करण्याची मागणी केली. देशातल्या 50 टक्क्यांहून जास्त लोक हे मागासलेले आहेत. त्यांची जनणा झाली पाहिजे. नरेंद्र मोदी हे जिकडे जातात तिकडे सांगतात की ते ओबीसी आहेत म्हणून. मग जातीय जनगणना करायला काय अडचण आहे?