21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी महापूजा

फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी महापूजा

सकल मराठा समाजाच्या ५ मागण्या मान्य, आंदोलन मागे

पंढरपूर/सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते; परंतु सकल मराठा समाजाने या शासकीय महापूजेला विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने चर्चा करून सकल मराठा समाजाच्या पाचही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले. त्यामुळे दि. २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासन व सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव तसेच सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री यांना शासकीय महापूजा करण्यास केलेला विरोध व आंदोलन मागे घेतले असून शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री यांना कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीसोबत दुस-यांदा बैठक घेऊन मराठा समाजाचे आंदोलन मागे घेण्याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्ह्यातील कुणबी पुरावे नोंदी गोळा करण्याची मोहीम गतीने सुरू असून त्यात अधिक गती यावी, यासाठी सर्व संबंधित तहसीलदार व प्रांताधिकारी यांना सूचित केले जाईल. तसेच पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्यासाठी पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच प्रांताधिकारी यांना मराठा भवनसाठी जागा शोधण्याबाबतही कळविण्यात आले आहे. बांधकामासाठी निधीची तरतूद करण्याचे प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. यासोबतच पंढरपूर येथे सारथीचे उपकेंद्र सुरू करण्याबाबत शासनाला लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी वसतिगृहासाठीही प्रयत्न केले जाणार असून मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री महोदय हे वेळ देणार आहेत, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सर्व मागण्या मान्य
या वेळी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे, मराठा भवन बांधणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणे व मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळणे या मागण्या करण्यात आल्या. त्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या पाचही मागण्या तात्काळ मान्य केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR