परभणी : जिल्ह्यात गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतक-यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतक-यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
माहे सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२च्या सततच्या पावसाचे, मार्च २०२३मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या फळपिकांचे, माहे नोव्हेंबर-डिसेंबर २०२३मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत बाधित शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतक-यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. जिल्ह्यातील शेतक-यांकडून विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गावडे यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
त्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन, मंत्रालय मुंबई यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये बाधित शेतक-यांना अनुदानाची रक्कम वितरीत करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरून यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली. ही यादी अपलोड केल्यानंतर बाधित शेतक-यांना आपल्या गावातील तलाठ्याकडून व्हीके (विशिष्ट क्रमांक) घेऊन ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्याबाबत तहसील कार्यालयाकडून तलाठ्यामार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले असून बाधित शेतक-यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही. अशा शेतक-यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ती करून घ्यावी अन्यथा आपल्या आधार लिंक खात्यावर अनुदान जमा होणार नाही, असे जिल्हाधिकारी गावडे यांनी कळविले आहे.