नाशिक : टोमॅटोला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत. टोमॅटो उत्पादकांना चांगला भाव मिळाला आहे. पिंपळगाव बसवंत येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचा बाजारभाव वधारला. २० किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटला सरासरी ५३१ रुपये दर मिळाल्याने शेतक-यांना चांगला फायदा झाला. टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. परदेशात पण टोमॅटोला जोरदार भाव मिळाला. देशातील इतर राज्यांतून टोमॅटोच्या मागणीत वाढ झाली. त्याचा परिणाम टोमॅटोच्या किंमतींवर लागलीच दिसून आला. भाव वधारले.
पिंपळगाव बसवंत येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत २० किलो टोमॅटोच्या कॅरेटला सरासरी ५३१ रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ८९ हजार ३७३ कॅरेट टोमॅटोची आवक झाली. टोमॅटोला जास्तीत जास्त ७०० रुपये, कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ५३१ रुपये इतका २० किलोच्या कॅरेटला दर मिळाला. यामुळे शेतक-यांना फायदा झाला. दिवाळीनंतर टोमॅटोने चांगलीच उचल खाल्ली.
देशासह परदेशांतही वाढली मागणी
यंदा पावसाने ओढ दिल्याने सर्वच पिकांवर परिणाम झाला. जुलै ते सप्टेंबरपर्यंत टोमॅटोला चांगला भाव मिळाला. उत्तर भारतात पावसाचा कहर झाला तर उर्वरित भागात पावसाने डोळे वटारले होते. केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केला आणि नेपाळमधून आयातीला परवानगी दिली. सध्या दुबई, ओमान, कुवेत तसेच बांगलादेश या आखाती देशांत टोमॅटोची मागणी वाढली आहे. तर देशांतर्गत हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतून टोमॅटोच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.