मुंबई : मुंबई शहरात बहुतांश दुकानांची नावे हिंदी किंवा इंग्रजी भाषेत दिसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ब-याच काळापासून याविरोधात भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतून पाट्या लावाव्या, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात येत आहे.
हे प्रकरण न्यायालयात गेले असून दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदतही देण्यात आली होती. याचीच आता मनसेने पुन्हा आठवण करून दिली आहे. तसेच २५ नोव्हेंबरपर्यंत दुकानांची नावे मराठीत झाली नाहीत तर.. खळ्ळखट्याकचा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. (पूर्वीचे ट्वीटर) या मायक्रोब्लॉगिंग साईटवर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. आधी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या या मराठीत व्हायला हव्या आहेत. त्याला आता ५ दिवस उरले.
दोन भाषांत पाट्या करण्याची दुकानमालकांची इच्छा असेलच तर देवनागरी लिपीतली मराठी भाषा आधी असली पाहिजे आणि मराठीमधील नाव हे बाकी भाषेतील नावापेक्षा मुळीच छोटं नसलं पाहिजे, असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा-शर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ या कायद्याचा संदर्भही त्यांनी दिला आहे.