नवी दिल्ली : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी पंजाब आणि हरियाणामधील १४ ठिकाणी छापे टाकले. हरियाणातील कुरुक्षेत्र आणि यमुनानगर येथे छापेमारी करण्यात आल्याचे एनआयएने सांगितले. जालंधर, मोगा, लुधियाना आणि पटियालासह पंजाबमधील अनेक भागात छापे टाकाम्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एनआयएने ऑगस्ट २०२३ मध्ये या प्रकरणाच्या तपासासाठी सॅन फ्रान्सिस्कोला भेट दिली होती. त्याअंतर्गत हल्लेखोरांची माहिती गोळा करण्यात आली.
एनआयएने सांगितले की, तपासादरम्यान भारतीय दूतावासावर हल्ल्याचा कट रचणाऱ्या काही लोकांची ओळख पटली आहे. एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, वाणिज्य दूतावासावर १९ मार्च आणि २ जुलै रोजी हल्ला झाला होता. ऑपरेशन दरम्यान आरोपींशी संबंधित माहिती असलेला डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय अन्य आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
बेकायदेशीर प्रवेश, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, कॉन्सुलर अधिकाऱ्यांना दुखापत करणे आणि इमारतीत जाळपोळ करणे यासारख्या गुन्ह्यांसंदर्भात एजन्सी या प्रकरणाचा तपास करत आहे. प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, वाणिज्य दूतावासावर हल्ला करणाऱ्यांची ओळख पटवणे, त्यांच्यावर खटला चालवणे आणि अशा भारतविरोधी घटकांना कडक संदेश देणे या उद्देशाने एनआयएया प्रकरणाचा तपास करत आहे.