मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय ग्राउंडवर जामीन आणखी दोन आठवड्यांनी वाढविण्यात आला आहे. नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर आज त्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांना पुन्हा जेल की बेल अशी चर्चा रंगली होती. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या जामीनामध्ये दोन आठवड्यांसाठी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, ईडीकडून ईडीच्या वाकिलांना न्यायालयामध्ये कोणती भूमिका घ्यायची याबाबत कोणतीही सूचना नसल्याने जामीन वाढवत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे अंतरिम जामीन त्याचा दोन आठवड्यांसाठी वाढविण्यात आला. दरम्यान, आज विधानपरिषद निवडणुकीसाठी नवाब मलिक विधानभवनात पोहोचले. नवाब मलिक अजित पवार गटाच्या मागे उभे असले, तरी महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करण्यात आले होते. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे आता कसे नवाब मलिक चालतात अशी सुद्धा विचारणा विरोधी पक्षांकडून झाली होती. यानंतर एक आठवड्यापूर्वी सहा महिन्यांनी नवाब मलिक पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या बैठकीत सहभागी झाले होते. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी महायुतीने नऊ उमेदवार उभे केले आहेत. यातील दोन उमेदवार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. यामध्ये राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या प्रवेशावर महायुतीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांनी भाजपची भूमिका काय असा सवाल केला होता. दुसरीकडे, नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना २०२२ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. नवाब मलिकवर अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांसोबत पैशांच्या व्यवहाराचा आरोप होता. ईडीचे पथक डॉन दाऊद इब्राहिमसोबत पैशाचे व्यवहार आणि त्याच्या बहिणीसोबतच्या जमिनीच्या व्यवहाराचा तपास करत होते. नवाब मलिक हे अनेक दिवस तुरुंगात होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांना वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर करण्यात आला होता.