मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला वैदर्भीय मतदारांचा कौल आजही कायम असून राज्यातील मतदारांचा महाविकास आघाडीवरील विश्वास वाढत असल्याची माहिती राज्यव्यापी सर्वेक्षणातू स्पष्ट झाली आहे. विशेषत: महायुतीसाठी मतविभाजनाचा लाभ देणा-या वंचितचा प्रभावही मावळतीला लागल्याचे चित्र असून, ही राजकीय परिस्थिती महायुती आणि विशेषत: भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील दहा पैकी केवळ तीन जागांवर विजय मिळाल्याने भाजप नेतृत्वातील महायुतीला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेच्या काळात शेती प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष, जातीय गणिते, विद्यमान खासदारांविरोधातील रोष, सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांमध्ये आलेला उन्माद, पक्षांची अनावश्यक फोडाफोडी, मतविभाजनात आलेले अपयश आदी कारणांमुळे महायुतीला विदर्भात जोरदार फटका बसला. आता अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे.
लाडक्या बहिणींची ही आघाडीलाच साथ
लाडकी बहिण योजना, शेतक-यांना वीजबिल माफी, आदी लोकप्रिय घोषणा झाल्या. त्यापैकी लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परंतु, ताज्या सर्वेक्षणात विदर्भातील निम्म्या महिलांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे. अपेक्षित रोजगार निर्मिती व महागड्या उच्च शिक्षणामुळे युवकांमध्येही नाराजीचे चित्र आहे.
काँग्रेसमध्ये उत्साह
विदर्भ हा पारंपरिकरीत्या काँग्रेस मतपेढी असलेला भाग आहे. परंतु, शिवसेनेचा पश्चिम विदर्भातील प्रवेश व राम मंदिर आंदोलनाच्या काळात विदर्भात भाजपचा प्रभाव वाढत गेला. गेल्या दहा वर्षांपासून तर भाजपचा गड बनला होता. परंतु, ताज्या लोकसभा निवडणुकीनंतर त्याला भगदाड पडले.
जातीय समीकरणांचा प्रभाव
गेल्या काही निवडणुका पाहिल्या तर शेती प्रश्नाकडे सत्ताधा-यांचे झालेले दुर्लक्ष, आश्वासनांकडे पाठ फिरविणे, बदलती जातीय समीकरणे, पक्षांची फोडाफोडी, यंत्रणांचा गैरवापर आदींमुळे राजकीय क्षेत्रात अनपेक्षित बदल होत आहेत. पूर्व विदर्भात ओबीसींची संख्या मोठी आहे. त्याचा राजकारणावर परिणाम होतो. पश्चिम विदर्भात मराठी पाटील समाजाचा राजकारणावर प्रभाव आहे. शिवाय दलित व मुस्लिमांची मतेही निर्णायक ठरत आहेत.
मतविभाजन टळतेय
विदर्भात महायुतीला विजयी व्हायचे असेल तर महाविकास आघाडीला मिळणा-या मतांमध्ये विभाजन घडवून आणणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी थेट लढती झाल्याने महायुतीला फटका बसला. अकोला व बुलडाणा या दोन्ही जागा केवळ मतविभाजनाच्या गणितामुळे महायुतीला जिंकता आल्या. त्यात वंचित बहुजन आघाडीचाही प्रभाव दिसला नाही. त्यामुळे यापुढे विधानसभा निवडणुकीच्या काळातही हे गणित जुळविणे आवश्यक बनले आहे.