गोंडा : उत्तर प्रदेशमधील गोंडा रेल्वे स्थानकाजवळ चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.१८ जुलै) दुपारी घडली. यूपीचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण झाले. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झालेय. रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये चनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिका-यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.