24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयबांगलादेशात आतापर्यंत ११५ मृत्यू

बांगलादेशात आतापर्यंत ११५ मृत्यू

भारतीय उच्चायुक्तांनी आपत्कालीन क्रमांक केले जारी

ढाका : बांगलादेशात सरकारी नोक-यांमध्ये आरक्षणविरोधी हिंसाचार सुरू झाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी देशभरात कडक संचारबंदी लागू केली आहे. या काळात राजधानी ढाकाच्या सर्व भागात लष्कर तैनात करण्यात आले असून, ते सर्व भागात गस्त घालत आहे. तर दुसरीकडे देशात सार्वजनिक मेळाव्यावर बंदी असूनही, संचारबंदी दरम्यान, मृत्यूचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यानुसार, हिंसाचाराला बळी पडलेल्यांचा आकडा ११५वर पोहोचला आहे, असे बांगलादेशच्या उच्च पदस्थ अधिका-यांनी सांगितले.

बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारामुळे शेकडो लोक अजूनही जखमी आहेत. शनिवारीही काही टीव्ही चॅनेल्स बंद राहिले आणि बहुतांश वृत्तपत्रांच्या वेबसाईट बंद होत्या. तर ढाका येथील अमेरिकन दूतावासाने परिस्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे म्हटले आहे. देशात लागू करण्यात आलेला कर्फ्यू शनिवारी दुपारी काहीसा शिथिल करण्यात आला, मात्र त्यानंतर आज सकाळी १० वाजेपर्यंत तो पुन्हा लागू करण्यात आला.

भारतीय नागरिकांना संपूर्ण सुरक्षा : जयशंकर

दरम्यान, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालय बांगलादेशमध्ये राहणा-या भारतीय नागरिकांना संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये जयशंकर यांनी लिहिले की, बांगलादेशातील भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना आणि हितचिंतकांना सुरक्षा आणि मदत देणे हे आमचे प्राधान्य आहे.

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालय भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी मदत करत आहे. सुरक्षित प्रवासासाठी परराष्ट्र मंत्रालय नागरी विमान वाहतूक, इमिग्रेशन, जमीन बंदरे आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) अधिका-यांशी समन्वय साधत आहे, त्यासाठी भारतीय उच्चायुक्तांनी आपत्कालीन क्रमांकही जारी केले आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.

ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी सदरचे आपत्कालीन क्रमांक केले जारी

भारतीय उच्चायुक्तालय, ढाका- ८८०-१९३७४००५९१
भारताचे सहाय्यक उच्चायुक्त, चटगांव- ८८०-१८१४६५४७९९
भारताचे सहाय्यक उच्चायुक्त, राजशाही- ८८०-१७८८१४८६९६
भारतीय सहाय्यक उच्चायुक्त, सिलहेत- ८८०- १३१३०७६४१ १/८८० -१३१३०७६४१७

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR