मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीने वेग घेतला असून या सुनावणीत रोज नवनवीन व खळबळजनक मुद्दे पुढे येत आहेत. शिवसेनेने बजावलेला व्हीप बनावट असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आधी केला होता. गुरूवारच्या सुनावणीत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटविण्याचा ठरावच विधिमंडळ पक्षाच्या तथाकथित बैठकीत झाला नव्हता नंतर तसा ठराव तयार करण्यात आल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. या ठरावावर असलेल्या उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांच्या सह्याही बनावट असल्याचा युक्तिवाद करीत जेठमलानी यांनी या खोट्या सह्यांसाठी प्रतोद सुनील प्रभू यांना जबाबदार असल्याचा दावा केला.
शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सलग सुरू आहे. या सुनावणीत ठाकरे गटाच्या अपात्रतेच्या याचिकेत दिलेले मुद्देच चुकीचे ठरविण्यासाठी शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जात आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी सलग ३ दिवस सुरू आहे. या उलट तपासणीत सुनील प्रभू यांच्यावर अडचणीच्या प्रश्नांचा भडिमार जेठमलानी यांच्याकडून केला जात आहे. व्हीप पाठोपाठ ठरावच झाला नसल्याच्या मुद्याला खोडून काढत वकिलांकडून म्हणण्यात आले ते खोटे असल्याचे पुन्हा एकदा सुनील प्रभू यांनी सांगितले.
जेठमलानी यांनी प्रभूंना प्रश्न विचारला, व्हीप आमदार निवासात पाठवला होता का? २० जूनच्या विधान परिषद शिवसेनेच्या उमेदवाराला किती आमदारांनी मतदान केले? नेमका किती आमदारांना व्हीप प्रत्यक्षात दिले? जे आमदार तिथे नव्हते त्यांना कोणत्या मोबाईलवरून व्हीप पाठवला? व्हीप जर पक्ष कार्यालयातील कर्मचारी मनोज चौगुले यांच्या मोबाईलवरून व्हॉटस अॅप केला तर तो तुम्ही बघितला का? अशा प्रश्नांचा भडिमार त्यांनी केला. त्या वर स्पष्टीकरण देताना प्रभू म्हणाले, जे ९ आमदार पक्ष कार्यालयात होते त्यांना तिथेच व्हीप देण्यात आला. आमदार निवासातील आमदारांना कार्यालयीन कर्मचा-यांकडून व्हीप पाठविण्यात आला व त्यांची सही घेण्यात आली. सही केलेली कागदपत्रे पक्ष कार्यालयात आहेत. जे आमदार तिथे नव्हते त्यांना मनोज चौगुले यांच्या मोबाईलवरून व्हीप पाठविण्यात आला. त्यांनी तो पाठवल्याचे मला सांगितले आणि मी ते मानले. मी प्रतोद असल्यापासून आणि त्याच्या आधीपासून व्हीपचा मेसेज पक्ष कार्यालातील कर्मचा-यांकडून दिला जातो. हे व्हीप मी मनोज चौगुले या कर्मचा-याच्या माध्यमातून पाठवले, असे सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.
मग पुरावा म्हणून मनोज चौगुलेचा फोन किंवा त्यांचा फोन इथे सादर केलेला नाही तसेच त्यांचा इथे साक्षीदार म्हणून उल्लेख नाही. यामुळे व्हीपच्या बाबतीत कोणताही मेसेज कुठल्याही आमदाराला पाठवलेला नाही. असा व्हीपच काढण्यात आलेला नाही, असे जेठमलानी म्हणाले. त्या वर हे खोटे असल्याची साक्ष प्रभू यांनी नोंदवली. जेठमलानी यांनी तुम्ही व्हीपबाबत खोटी कागदपत्रे सादर केलीत. इथे आणि सर्वोच्च न्यायालयातही, असा दावा केला. त्या वर प्रभूंनी मी संविधानाची शपथ घेतली आहे आणि मी बोलतोय ते सत्य आहे, खोटे नाही, असे म्हटले.
माझ्या अशिलांना गटनेते पदावरून हटविण्याचा ठराव कोणी तयार केला? हा ठराव कोणी मांडला? असा सवाल करताना मंत्री उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांच्या या ठरावावर दाखविण्यात आलेल्या सह्याच खोट्या आहेत, असा दावा जेठमलानी यांनी केला. या सह्या तुमच्या समोर करण्यात आल्या का? माझ्या अशिलांकडून या सह्या आपल्या नसल्याचे मला सांगितले आहे. या सह्या त्यांनी केल्या तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते पाहिले का? कोणत्या वेळेत हा ठराव करण्यात आला? माझ्या म्हणण्यानुसार हा ठरावच झालेला नाही. सह्या असलेले तीनही आमदार बैठकीला उपस्थित नव्हते, असे दुस-या प्रतिज्ञापत्रात म्हणण्यात आले आहे त्यामुळे इथे देण्यात आलेला ठरावच मुळात बनावट आहे. त्यासाठी मी प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांना जबाबदार धरतो, असेही जेठमलानी म्हणाले.
त्या वर प्रभू यांनी स्पष्ट केले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली. या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला. त्यांच्या उपस्थितीत हा ठराव करण्यात आला. आमदार रवींद्र वायकर यांनी हा ठराव मांडला. माझ्या समक्ष यावर स्वाक्ष-या करण्यात आल्या आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही या बैठकीला उपस्थित होते. या आमदारांनी सह्या करताना पाहिले आहे. मी साक्षीदाराच्या पिंज-यात आहे म्हणून तुम्ही मला गुन्हेगार ठरवत आहात; पण मी संविधानाची शपथ घेतली आहे. मी खोटे बोलणार नाही. वकिलांकडून जो दावा करण्यात आला आहे तो खोटा आहे, असे प्रभू यांनी सांगितले.