नवी दिल्ली : नीति आयोगाच्या बैठकीत बंगालसोबत भेदभाव केला जात असल्याचा दावाकरत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडल्या. राज्यसासाठी निधीची मागणी करताना आपला माईक बंद केला गेला. या बैठकीत संपूर्ण विरोधी पक्षाचा अपमान करण्यात आला आहे. असा आरोप ही ममतांनी केला. ममतांनी दावा केला की इतरांना २० मिनिटे बोलण्याची परवानगी होती, तर त्यांना फक्त पाच मिनिटे बोलण्याची परवानगी होती, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, नीति आयोगाच्या बैठकीपुर्वी ममता बॅनर्जी यांनी नीति आयोग रद्द करून नियोजन आयोग परत आणण्याची मागणी केली होती. ममता यांच्या या वक्तव्याने राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा रंगली आहे.देशाची राजधानी दिल्लीत आज नीति आयोगाची बैठक सुरू आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. मात्र, अनेक विरोधी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
दरम्यान,आश्चयार्ची गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीचा उपस्थित होत्या, मात्र बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच त्या बैठक सोडून निघून गेल्या. एवढेच नाही तर केंद्र आणि सत्ताधारी भाजप सरकारवर त्यांनी अनेक आरोप केले आहेत.