मुंबई : बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. २१ मे रोजी अहमदाबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सामना पाहत असताना शाहरूख खानला उष्माघात झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी शाहरूख लवकरच बरा झाला आणि आपल्या कामावर परतला. मात्र, आता शाहरूख खानच्या प्रकृतीबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार किंग खानला पुन्हा एकदा उपचाराची गरज पडली असून, उपचारासाठी तो अमेरिकेला रवाना होणार आहे.
सूत्रांच्या मते, शाहरूख खान आज, अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. शाहरूख खान सोमवारी, २९ जुलै रोजी डोळ्यांच्या उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात गेला होता. त्या ठिकाणी शाहरूखच्या डोळ्यावर समाधानकारक उपचार झाले नाहीत. यामुळे शाहरूखने लगेचच उपचारासाठी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला असून, तो डोळ्यांवर उपचार करण्यासाठी आज अमेरिकेला जाणार आहे, मात्र शाहरूखच्या डोळ्यांच्या समस्येची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, या बातमीमुळे शाहरूख खानचे चाहते तणावात आहेत. त्याच्या यशस्वी आणि सुरक्षित उपचारांसाठी बहुतेक चाहत्यांनी प्रार्थना केली आहे. यापूर्वी केकेआरचा मालक शाहरूख खानला नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल सामन्यादरम्यान उष्माघात झाला होता. जेव्हा त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाला तेव्हा तो अहमदाबादमध्ये होता. त्यावेळी त्याने के. डी. रुग्णालयात उपचार घेतले होते. शाहरूख सध्या सुजॉय घोषच्या ‘किंग’मध्ये काम करत असल्याची माहिती आहे.