परभणी : बँकेच्या कामासाठी जमिनीचा फेरफार करून सातबारावर नोंद घेण्यासाठी ८० हजारांची मागणी करून पाहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये लाच स्विकारताना फुलकळस सज्जा तलाठी दत्ता संतराम होणमाने (४७) यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
यातील तक्रारदाराने त्यांच्या पत्नीच्या नावे फुलकळस शिवारात एकूण २ गुंठे जमीन विकत घेतली आहे. बँकेच्या कामासाठी जमिनीचा फेरफार करून सातबारावर नोंद घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दि. ५ जुलै रोजी तक्रारदाराने तलाठी होणमाने यांची भेट घेतली व कागदपत्रे देऊन फेरफार होण्यासाठी विनंती केली. दि. २२ जुलै रोजी तक्रारदार फेरफारच्या कामासाठी भेटला असता तलाठी होणमाने यांनी तक्रारदार यांना प्रति गुंठा ४० हजार रुपये याप्रमाणे ८० हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. मात्र त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. २९ जुलै रोजी एसीबी परभणी येथे त्याबाबत तक्रार दिली.
गुरुवार, दि. १ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान तलाठी होणमाने यांनी जमिनीच्या फेरफार कामासाठी पहिला हप्ता ४० हजार रुपये लगेच आणून देण्यास सांगितले. त्यावरून पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तलाठी होणमाने यांनी तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रुपये लाच रक्कम स्विकारताना पथकाने रकमेसह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी तथा अँटी करप्शन ब्युरो, परभणीचे पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर, सापळा व तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे व अँटी करप्शन ब्युरोने ही कारवाई यशस्वी केली.