सोलापूर : सोलापूर शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे; मात्र त्या तुलनेत बसस्थानकात प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. सोलापूर एस.टी. आगारात समस्यांचा थांबा असून गर्दुल्यांचा वावर वाढत आहे. अनेक मार्गांवरील बसेस स्थानकात येतात. मात्र त्या वेळेवर येत नसल्याने आगारात प्रवाशांना दीर्घ काळ वाट पाहावी लागत आहे. याचा नाहक त्रास या प्रवाशांना सोसावा लागतो.
दरम्यान, महिलांसाठी स्वच्छतागृहासाठी पैसे मोजावे लागत आहेत. सुरक्षा आहे केवळ कागदावर. यामुळे प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ग्रामीण भागातून एस.टी.ने प्रवास करणा-यांची संख्या लक्षणीय आहे; मात्र आजच्या घडीला येथील बस डेपोत घाण, गर्दुले असून बसचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. पावसामुळे रस्त्यांवरील खड्डे आणि एस.टी. महामंडळाच्या बस जुन्या झाल्या आहेत. त्यातच अर्ध्या तासाने असलेल्या बससाठी एक ते दीड तास प्रवाशांना वाट पाहावी लागत आहे. त्यात या बस आगारात घाणीचे साम्राज्य आहे. महिलांसाठी शौचालय दुर्गंधीयुक्त आहे. त्यामुळे महिला आणि मुलींना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. बस डेपोच्या छपराला गळती लागली आहे.
पाऊस सुरू झाला की, छत्री घेऊन बसची वाट बघत बसावे लागते. बसण्यासाठी आसन व्यवस्था तोकडी आहे, पिण्याच्या पाण्याची सोय असून नसल्यासारखी आहे. अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या या बस डेपोला कोणी वाली आहे का नाही, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.याठिकाणी गर्दुल्यांनी आपला मुक्काम ठोकला आहे. सोलापूरहून पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, धाराशिव, तुळजापूर आदी ठिकाणी लांब पल्ल्यांसाठी आगारातून बस सुटतात. शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातून शहराजवळ असल्याने या ठिकाणी बाजार तसेच शालेय आणि कॉलेज विद्यार्थी हे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे या सगळ्यांना बसचा प्रवास परवडतो.
बसस्थानकात अनेकदा गर्दुले ठाण मांडून असतात. त्यामुळे सायंकाळी उशिरा येथून प्रवास करण्यास भीती वाटते, अशी प्रतिक्रिया अनेक महिला व शालेय, कॉलेज तरुणींनी दिल्या आहेत. त्यात याठिकाणी एस.टी. महामंडळाच्या जागेत अनेक खासगी वाहनांनी कब्जा केला आहे. याठिकाणी अनधिकृतपणे आपल्या गाड्या पार्किंग केल्या जातात. इतके होऊनही एस.टी. महामंडळ मात्र, याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.