ढाका : बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली. ‘हिंदू अॅक्शन’ या वॉशिंग्टनस्थित एनजीओने या आंदोलनाचे नेतृत्व केले. एनजीओ हिंदू अॅक्शनने न्यूयॉर्कमध्येही अनेक ठिकाणी निदर्शने केली.
बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक ज्यूंवर, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवर होणा-या, झालेल्या हल्ल्यावर संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही निश्चितपणे वंशावर आधारित हल्ले किंवा त्यावर आधारित हिंसाचाराच्या विरोधात उभे आहोत.
५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये हिंदूंना लक्ष्य केले
दरम्यान, बांगलादेशातील ६४ पैकी ५२ जिल्ह्यांमध्ये हिंदू आणि त्यांच्या मालमत्तांना लक्ष्य करण्यात आले आहे. या परिस्थितीमुळे देशात राहणारी अल्पसंख्याक लोकसंख्या भविष्यातील अनिश्चिततेमुळे अस्वस्थ आणि भयभीत असल्याचे हिंदू परिषदेने म्हटले आहे. त्यांनी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्याकडे सुरक्षा आणि संरक्षण मागितले आहे. तर अवामी लीगच्या दोन हिंदू नेत्यांची हत्या करण्यात आली आहे.
भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता
बांगलादेशातील हिंसाचारानंतर भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. शुकवारी कूचबिहारमधील सीतलकुची सीमेवर मोठ्या संख्येने बांगलादेशी लोक सीमा ओलांडण्यासाठी जमले होते. मात्र बीएसएफने त्यांना रोखले. आजही या भागात सतर्कता वाढवण्यात आली असून बीएसएफचे जवान या भागात सतत गस्त घालत आहेत.