कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील सरकारी आरजीकर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या सेमिनार रूममधून शुक्रवारी सकाळी एका कनिष्ठ महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. याबाबत माहिती देताना एका अधिका-याने सांगितले की, अटक करण्यात आलेली व्यक्ती बाहेरची होती, त्याला रुग्णालयातील विविध विभागात मोफत प्रवेश होता. दरम्यान, आपल्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला असून, या प्रकरणातील सत्य लपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. याप्रकरणी अन्य दोन इंटर्न डॉक्टरांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होता आणि शरीराच्या इतर भागांवर जखमांच्या खुणा आढळल्या. अहवालात पुढे म्हटले आहे की, तिचे डोळे आणि तोंडातून देखील रक्तस्त्राव होत होता. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री २ वाजता ड्युटी संपल्यानंतर महिला डॉक्टरांनी जेवण केले आणि नंतर विश्रांतीसाठी चौथ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये गेल्या. मिळालेल्या माहितीनुसार, सेमिनार हॉलमध्ये विश्रांतीसाठी वेगळी खोली नाही, याशिवाय तेथे सीसीटीव्ही कॅमेरेही बसवलेले नाहीत. गुरुवारी रात्रीची ड्युटी करणा-या रुग्णालयातील सर्व कर्मचा-यांची पोलिस चौकशी करत आहेत.
ज्युनियर डॉक्टरांनी केली निदर्शने
या घटनेमुळे संतप्त झालेल्या ज्युनिअर डॉक्टरांनी काम बंद पाडून आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच राज्याचे आरोग्य सचिव नारायण स्वरूप निगम आणि कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल स्वत: रुग्णालयात फॉरेन्सिक टीमसोबत पोहोचले. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करत आंदोलक ज्युनियर डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यापासून रोखले. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात पोलिसांना यश आले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या पालकांना निष्पक्ष तपास आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.