16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeसंपादकीय विशेषसहारासम्राटांचा उदय आणि अस्त

सहारासम्राटांचा उदय आणि अस्त

सहारा उद्योगसमूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने सेबीकडील ‘सहारा’ची २५ हजार कोटींपेक्षा अधिक असणा-या रकमेचे काय होणार यावर चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी सुब्रतो रॉय हे भारतीय अर्थउद्योग समूहातील दिग्गजांच्या मांदियाळीतील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. परंतु एका चिठ्ठीने सहाराच्या पतनाची सुरुवात झाली. १९७८ मध्ये त्यांनी केवळ दोन हजार रुपयांवर काम सुरू केले आणि कालांतराने त्यांंची निवळ मालमत्ता ही २,५९,९०० कोटींपर्यंत पोचली होती. पण गुंतवणूकदारांच्या पैशांच्या व्यवहारातील अनियमिततेमुळे त्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली.

चौदा नोव्हेंबर रोजी सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे निधन झाले. ७५ वर्षांचे रॉय हे अनेक वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने सेबीकडील ‘सहारा’ची २५ हजार कोटीपेक्षा अधिक असणा-या रकमेचे काय होणार यावर चर्चा सुरू झाली आहे. सेबीने २०११ मध्ये सहारा समूहाच्या दोन कंपन्या सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने बाँडच्या माध्यमातून तीन कोटी गुंतवणूकदारांकडून गोळा केलेला पैसा संबंधितांना परत करण्याचे आदेश दिले होते. कारण या दोन्ही कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन करत पैसा उभारल्याचे सेबीने म्हटले होते.

३१ ऑगस्ट २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने देखील सेबीचे आदेश कायम ठेवत सहारा समूहाने गोळा केलेली रक्कम ही १५ टक्के व्याजासह गुंतवणूकदारांना परत देण्याचे आदेश दिले होते. यासाठी सहारा सेबी एसक्रो खाते सुरू केले. यात सहारा समूहाकडून २४ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. यादरम्यान परतफेडीसाठी विशेष रूपाने सुरू केलेल्या बँक खात्यात जमा केलेली रक्कम ही २५ हजार कोटींवर पोचली. वार्षिक अहवालानुसार, सेबीकडे ३१ मार्च २०२३ पर्यंत ५३,६८७ खात्यांशी संबंधित १९,६५० अर्ज आले. ४८,३२६ खात्यांशी संबंधित १७,५२६ अर्जांचा विचार करत १३८.०७ कोटी रक्कम संबंधितांना परत देण्यात आली. यात ६७.९८ कोटी रुपये व्याजाचे होते. अर्थात अन्य अर्जाची कोणतीही माहिती न मिळाल्याने ते खाते बंद करण्यात आले. म्हणजेच ११ वर्षांत गुंतवणूकदारांना केवळ १३८.०७ कोटी रुपये परत मिळाले आहेत. यावर्षी मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना सेबीकडे जमा असलेल्या २४ हजार कोटींपैकी ५ हजार कोटींचे वितरण करण्याची परवानगी दिली. न्यायालयाने सहारा सेबी खात्यातून ५ हजार कोटी रुपये सहकारी समितीच्या केंद्रीय नोंदणीकृत संस्थेला स्थानांतरित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर जुलै महिन्यात सरकारने सहारा रिफंड पोर्टलची सुरुवात केली.

सुब्रतो रॉय हे १९७६ मध्ये गोरखपूर येथे एक डबघाईला आलेली चिटफंड कंपनी सहारा फायनान्समध्ये सामील झाले आणि त्यावर त्यांनी ताबा घेतला. १९७८ मध्ये सुब्रतो रॉय यांनी कंपनीच्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल केला आणि जुन्या धाटणीच्या पीअरलेस ग्रुपच्या आर्थिक मॉडेलचे अनुकरण केले. त्याला रेसिड्यू बिगर बँकिंग कंपनी (आरएनबीसी) असे स्वरूप दिले. यानुसार लहान प्रमाणातील ठेवी स्वीकारण्याचे काम केले जाते. १९९० च्या दशकाच्या शेवटी सहाराने पुण्याजवळील महत्त्वाकांक्षी अ‍ॅम्बी व्हॅली सिटी प्रकल्पाला सुरुवात केली.२००० मध्ये सहारा टीव्ही लाँच करण्यात आला आणि त्यानंतर सहारा वन असे त्याचे नामकरण करण्यात आले. २००३ मध्ये सहाराने तीन साप्ताहिके सुरू केली. सहारा समय (इंग्रजी), सहारा समय (हिंदी) आणि सहारा आलमी (उर्दू). २०१० मध्ये सहाराने लंडनमधील नामांकित ग्रोसवेनर हाऊस हॉटेल आणि २०१२ मध्ये न्यूयॉर्क शहरातील ऐतिहासिक प्लाझा हॉटेल आणि ड्रीम डाऊनटाऊन हॉटेलची खरेदी केली. जून २००९ मध्ये सुब्रतो रॉय यांनी सहारा इव्होल्स ब्रँड नावाने ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवेश केला. २०१० च्या आयपीएल फ्रेंचाईजी लिलावात सहारा समूहाने पुणे आयपीएल टीमची १७०२ कोटी रुपयांत खरेदी केली आणि त्याचे नाव पुणे वॉरियर्स इंडिया असे ठेवले. सहाराने हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषांत न्यूज आणि मनोरंजन वाहिन्या सुरू केल्या. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर सहारा स्टार हॉटेलची सुरुवात केली.

१९९० च्या दशकाच्या शेवटी रिटेल सेक्टरमध्ये क्यू शॉपची सुरुवात केली. या व्यवसायात सहारा प्रत्येक प्रकारचे प्रॉडक्ट विकत असे. सुब्रतो रॉय यांनी ओडिशा, झारखंड, छत्तीसगडमध्ये वीज उत्पादन क्षेत्रातही गुंतवणूक केली. भारतातील हवाई क्षेत्र तेजीत असताना एअर सहाराची सुरुवात झाली. त्यानंतर ही कंपनी जेट एअरवेजला विकण्यात आली. शिक्षण क्षेत्रातही सहाराने आपले नशीब आजमावले. सहारा कॉलेज ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल सायन्स तसेच इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची सुरुवात केली. दीर्घकाळापर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजक असणा-या सहाराने हॉकी संघाचे देखील प्रायोजकत्व स्वीकारले. सहाराने लखनौ शहरात खूप गुंतवणूक केली. त्यांनी सहारा सिटी, सहारा इस्टेट, सहारा होम्सची सुरुवात केली. गोमतीनगर येथे ३५० खाटांचे सहारा हॉस्पिटल सुरू केले. मॉल कल्चरच्या प्रारंभीच्या काळात हजरतगंज येथे सहारा मॉल देखील उभारले होते. सुब्रतो रॉय हे भारतीय उद्योगजगात प्रभावशाली उद्योगपतींपैकी एक होते आणि त्यांचे व्यापारी जाळे मोठे होते. या उद्योगांशी लाखो लोकांचे जीवन जोडले गेले होते. असा एकही व्यवसाय नसेल की तेथे सुब्रतो रॉय नसतील. मात्र चिटफंडचा व्यवसाय सोडला तर अन्य व्यवसायांत त्यांची कामगिरी फारशी राहिली नाही. एअरलाइन्स, रिअल इस्टेट प्रोजेक्ट, टीव्ही चॅनेल, वर्तमानपत्र, इन्स्टिट्यूट आदी उद्योगांत ते यशस्वी होऊ शकले नाहीत. तरीही सुब्रतो रॉय यांचा दूरदर्शीपणा आणि उद्योजकता ही अनेक वर्षे स्मरणात राहील, हे देखील तितकेच खरे.

दोन हजार ते दोन लाख कोटींपर्यंत
सहारा मीडिया ते रिअल इस्टेटपर्यंत विविध उद्योगांमार्फत प्रत्येक क्षेत्रात सुब्रतो रॉय यांचा सहभाग असायचा. ते न्यूयॉर्क प्लाझा हॉटेलसह लंडन ग्रोसव्हेनर हाऊस हॉटेलचे देखील मालक होते. त्यांनी दहा वर्षे भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व सांभाळण्याबरोबरच सहारा फॉर्म्युला वन रेसिंग टीम देखील तयार केली होती. सुब्रतो रॉय यांचे साम्राज्य फायनान्स, रिअल इस्टेट, मीडिया, हॉस्पॅटिलिटीसह विविध क्षेत्रांत होते. १९७८ मध्ये त्यांनी केवळ दोन हजार रुपयांवर काम सुरू केले आणि कालांतराने त्यांंची निवळ मालमत्ता ही २,५९,९०० कोटींपर्यंत पोचली होती.

‘सहाराश्री’ चे टायटल
सहाराश्री म्हटले जाणारे सुब्रतो रॉय यांचे नाव सहाराशिवाय अपूर्ण आहे. ते सहारा इंडिया परिवाराचे मॅनेजिंग वर्कर आणि अध्यक्ष होते. सुब्रतो रॉय यांनी १९७८ मध्ये सहाराची स्थापना केली आणि त्यांनी २००४ पर्यंत आपल्या कंपनीला देशातील सर्वांत यशस्वी समूह म्हणून नावारूपास आणले होते. एकेकाळी भारतीय रेल्वेनंतर सहारा भारतमध्ये कर्मचा-यांची संख्या सर्वाधिक होती. त्यांच्या सहारा साम्राज्यात सुमारे पंधरा लाख नागरिक काम करत होते.

रॉय यांची अधोगती कशी सुरू झाली?
सहाराच्या पतनाची सुरुवात एका चिठ्ठीने झाली. ही चिठ्ठी रोशनलाल नावाच्या एका व्यक्तीने नॅशनल हाऊसिंग बँकेला लिहिली होती. रोशन यांनी पत्रात सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनकडून जारी केलेल्या बाँडची तपासणी करण्याची मागणी केली होती. अर्थात बँकेकडे अशा प्रकारच्या तपासणीचा आणि चौकशीचा कोणताही अधिकार नव्हता. त्यामुळे त्यांनी हे पत्र भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीकडे पाठविले. यानुसार सेबीने चौकशी सुरू केली. २०१३ मध्ये सहाराने १२७ ट्रक भरून कागदपत्रे सेबीच्या कार्यालयात दाखल केले. यात त्यांनी ९० टक्के गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यात आल्याचा दावा केला होता. पण न्यायालयाने पुरावे मागितले असता ती बाब सहारा सिद्ध करू शकली नाही. २८ फेब्रुवारी २०१४ रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार रॉय यांना लखनौ पोलिसांनी अटक केली आणि तिहार तुरुंगात पाठविले. २०१६ रोजी रॉय यांच्या आईचे निधन झाल्याने ते पॅरोलवर तुरुंगाबाहेर आले. या सर्व प्रकरणामुळे उद्योगविश्वातील एका सम्राटाचा सन्मान, प्रतिष्ठा पूर्ण धुळीस मिळाली.

– विश्वास सरदेशमुख

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR