नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरलेली आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकरचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत. पूजा खेडकरला डीओपीटीने मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहण्यासाठी दिलेली मुदत काल (शुक्रवारी) संपली आहे. त्यामुळे आता यापुढे पूजा खेडकरला तिची बाजू मांडण्याची संधी यूपीएससीकडून दिली जाणार नाही. तशी नोटीस काल (शुक्रवारी) संध्याकाळी पूजा खेडकरच्या पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या बंगल्याच्या गेटवर आणि अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव इथल्या घराच्या दरवाज्यावर डीओपीटीकडून चिकटवण्यात आली होती.
मात्र खेडकरांच्या बंगल्यात राहणा-या व्यक्तींनी ही नोटीस काढून टाकल्याची माहिती आहे. या आधी देखील पुणे पोलिसांनी खेडकर कुटुंबाला वेळोवेळी नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खेडकर कुटुंबाने त्या स्वीकारल्या नाहीत आणि बंगल्याच्या गेटवर त्या चिकटवल्यानंतर त्या काढून टाकल्या होत्या. दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरवर गुन्हा दाखल केला असून २२ ऑगस्ट पर्यंत तिला न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. मात्र, आता यापुढे पूजा खेडकरचे यूपीएससीसमोर बाजू मांडण्याचे मार्ग बंद झाले आहे. त्यानंतर यूपीएससीकडून पूजा खेडकरवर पुढची कारवाई होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.