मुंबई : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी आरोपी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोप केले होते. हे आंदोलन राजकीय प्रेरित होते असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले होते. आता या घटनेवर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी भाष्य केले आहे. या आंदोलनातून केवळ बालिकेच्या अत्याचारावरील तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
बदलापूरची घटना आणि राज्यातील महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी या बंदमधून लोकांनी महाराष्ट्रात होत आहेत त्याच्या संबंधी तीव्र भावना व्यक्त कराव्यात असे म्हटले आहे. काल जे काही म्हणाले ते बदलापूरपर्यंत सीमित नव्हते. त्याआधी तीन चार दिवसापूर्वीही काही ना काही घटना घडल्याचे दिसले. बालिकांवरील महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपल्या राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याच्याबद्दल लोकांमध्ये असलेला उद्रेक आणि राग हा व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा बंद करण्यात येणार आहे.
हा बंद अत्यंत शांततेणे पाळण्यात यावा. माझ्या पक्षासह महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाने यामध्ये सहभागी व्हावे. याच्या माध्यमातून ज्या घटना महाराष्ट्रात होत आहेत त्याच्या संबंधी तीव्र भावना व्यक्त करणे हा त्याचा हेतू आहे असे शरद पवार म्हणाले.
आम्ही तिथे काय गेलो नव्हतो. पण माझ्या मते त्यावेळी कोण कुठल्या राजकीय पक्षाचे नव्हते. असा प्रकार झाल्यानंतर त्याच्यावर ते राजकीय होते अशी टिप्पणी करणे हे योग्य नाही. मुख्यमंत्री असे बोलले नसते तर योग्य झाले असते. हा प्रश्न लोकांच्या संवेदना व्यक्त करण्याचा आहे. इथे कुणीही राजकारण आणले नाही. आमच्या लोकांच्या मनातही नव्हत की अशाप्रकारे राजकीय काही करावे. केवळ बालिकेच्या अत्याचारावरील तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. याच्याकडे त्या दृष्टीकोनातून बघू नये असेही शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले होते शिंदे?
बदलापूरचे जे आंदोलन होते, ते राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. कारण एवढ्या लवकर जेव्हा आंदोलन होते, त्यात स्थानिक लोक असतात. येथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या एवढे होते आणि इतर ठिकाणावरून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलक आले होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तरीही ते हाटायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.