नागपूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपले कधीच पटले नाही. मंत्रिमंडळ बैठकीत मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आले की उलट्या होतात, असे विधान शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी केले. सावंतांच्या वक्तव्याचा समाचार घेत नागपूर येथे अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. तानाजी सावंतांच्या विधानाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, मला बाकीचे काही बोलायचे नाही. मला माझ्यापुरते बोला. याने असे केले, त्याने तसे केले. मला काही कुणाशी देणे-घेणे नाही.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध सर्व पक्षांना लागले आहेत. महायुतीत एकत्र असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुरावा कायम असल्याचे तानाजी सावंतांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
अजित पवार म्हणाले, मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवले आहे की, मला कोणावर टीका करायची नाही. मला कोणी काही बोलले तर माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. मी काम करतो. मी कामाचा माणूस आहे.
मोदी-शहांसोबत चर्चा झालेली आहे
भाजपचे प्रवक्ते गणेश हाकेही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती दुर्दैवी आहे, असे बोलले. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ठीक आहे. आम्ही चर्चा केलेली आहे. अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांशी आम्ही चर्चा केली आहे. तुम्ही जर असे बोलत बसलात, तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात. या बोलण्याला मी फार महत्त्व देत नाही. माझे काम चालू आहे.
आपल्याला राष्ट्रवादीची अॅलर्जी : तानाजी सावंत
तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असंही सावंत म्हणालेत. आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे.