श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आज गांदरबल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या बंडखोरासह इतर सहा उमेदवारांनीही गांदरबल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल केला आहे. ओमर अब्दुल्ला हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उत्तर काश्मीरमधील गांदरबल विधानसभा मतदारसंघात पोहोचले होते. यावेळी नॅशनल कॉन्फरन्सचे अनेक ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रीनगर ते गांदरबलपर्यंत त्यांच्यासोबत होते.
आज उमेदवारी अर्ज दाखल करणा-या उमर अब्दुल्ला यांच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांमध्ये जम्मू आणि काश्मीर युनायटेड मूव्हमेंटचे (जेकेयूएम) इश्फाक जब्बार आणि बंडखोर काँग्रेस नेते साहिल फारूक यांचा समावेश आहे. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) उमेदवार कैसर अहमद यांनीही अर्ज दाखल केला. अब्दुल्ला यांच्या विरोधात सुमारे ३० उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. तुरुंगात बंद मौलवी सर्जन बरकती यांची धाकटी मुलगी सुग्रा बरकती हिने पत्रकारांना सांगितले की, तिचे वडील ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधात गांदरबलमधून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे.