नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १८ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. भाजपाने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी अमित शाह यांनी कलम ३७० इतिहासात जमा झाले आहे. हा अनुच्छेद आता संविधानाचा भाग नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे कलम पुन्हा लागू करणे शक्य नाही, असे म्हटले. तसेच जम्मू काश्मीरच्या विकासासाठी जनतेने भाजपाला मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गेली १० वर्ष जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील सुवर्ण काळ राहिला आहे. यादरम्यान राज्यात शांतात प्रस्थापित करण्यात मोदी सरकारला यश आले आहे. तसेच राज्यातील दहशतवादही कमी झाला आहे. आम्हाला जम्मू-काश्मीरसाठी आणखी बरेच काम करायचे आहे. पुढच्या पाच वर्षात जम्मू-काश्मीरचा विकास करायचा आहे. त्यामुळे मी राज्यातील जनतेला आवाहन करतो की, त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जास्तीत जास्त उमेदवारांना विजयी करावे, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.