बारामती :
बारामतीची जागा कोण लढवणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण येत्या आठ दिवसांत यावर निर्णय होईल, असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत व्यक्त केले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. या मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार अशी लढत झाली. या निवडणुकीत सुप्रिया सुळे जवळपास दीड लाखांच्या लीडने निवडून आल्या.
२०१९ च्या निवडणुकीपर्यंत लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार असा बारामतीचा पॅटर्न ठरला होता. पण अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला शरद पवार कोणाला उमेदवारी देणार, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. बारामतीत माध्यमांशी बोलताना, मलाही यासंदर्भात काहीही माहिती नाही. बारामती विधानसभेची उमेदवारी कुणाला मिळणार? गेल्या काही दिवसांपासून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. युगेंद्र पवार हेदेखील बारामतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते शरद पवार यांच्यासोबत सातत्याने दिसत आहेत. त्यांनी बारामतीत, स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पण शरद पवार ऐनवेळी कुणाला उमेदवारी देणार, बारामतीच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.