पुणे : प्रतिनिधी
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान शरद पवार गटाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यातील गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रावरील गुलाबीचे, फुलाफुलांचे, भ्रष्टाचाराचे, महिलांच्या असुरक्षिततेचे संकट दूर होऊ दे म्हणत बाप्पाकडे राज्याच्या विकासाची प्रार्थना केली. तसेच अजित पवार यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. शरद पवार गटाकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. स्टार प्रचारक आणि खासदार अमोल कोल्हे पुण्यामध्ये आले आहेत. त्यांनी बाप्पाचे दर्शन घेत माध्यमांशी संवाद साधला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्याचबरोबर पुण्यातील इतर सार्वजनिक गणपतींची देखील त्यांनी आरती केली. यानंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाची तयारी कशाप्रकारे असेल याबाबत अमोल कोल्हे यांनी सांगितले.
कोल्हे म्हणाले की, बाप्पाकडे हेच मागितले की, महाराष्ट्रावरील गुलाबीचे, फुलाफुलांचे, भ्रष्टाचाराचे, महिलांच्या असुरक्षिततेचे संकट दूर होऊ दे. सर्वसामान्य तरुणांचे स्वाभिमानी सरकार येऊ दे, हीच मागणी बाप्पाकडे आहे, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे कोपरखळी दिली. पुढे ते म्हणाले की, महायुतीच्या ज्या काही योजना येतात, त्या योजनांची नावे वेगवेगळी आहेत. कालच ‘वर्षा’ बंगल्यावरील एक देखावा पाहिला. चांगल्या गोष्टींचे कौतुक झाले पाहिजे पण महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे.
महाविकास आघाडीचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. शरदचंद्र पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, असे विधान करत अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीचा विश्वास व्यक्त केला आहे.