डेहराडून : उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या संपूर्ण कारवाईचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पीएमओची टीम सिल्क्यरा बोगद्याच्या ठिकाणी पोहचली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पीके मिश्रा, गृह सचिव अजय कुमार भल्ला, उत्तराखंडचे मुख्य सचिव सुखबीर सिंग संधू आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. उत्तराखंड सरकारचे सचिव नीरज खैरवाल यांनी माध्यमांना ही माहिती दिली. बोगद्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन म्हणाले की, सर्व काही ठीक आहे. अन्न, पेय आणि औषध सर्व आत जात आहे.
हसनैन म्हणाले की, मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलायला लावले जात आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. गरजेनुसार नवीन मशीनही आणल्या जात आहेत. पावसाची शक्यता असली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, आमचे सर्व बांधव सुखरूप बाहेर येतील. प्रत्येकाच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही कोणत्याही एजन्सीची मदत घेण्यास तयार आहोत.
हसनैन म्हणाले की, सिल्क्यरा बोगद्यातून अमेरिकन ऑजर मशीन बाजूला काढले जात आहे. सोमवारी संध्याकाळपासून प्रत्येकी २ संघांमध्ये हाताने खोदकाम केले जाईल. उभ्या ड्रिलिंगमध्ये आम्ही ३०-३२ मीटरपर्यंत पोहोचलो आहोत. तिसरी लाइफलाइन म्हणून ६-८ इंची पाइपलाइन ७५ मीटरपर्यंत पोहोचली असून ८६ मीटरपर्यंत जावे लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच बारकोटच्या दिशेने आडवी रेषा तयार करण्यासाठी आज सहावा स्फोट घडवून आणण्यात आला आहे.