जिंतूर : राज्यातून मोठं मोठे प्रकल्प गुजरातला जात असताना महाराष्ट्र सरकार फक्त पाहत राहिले. परिणामी राज्यात बेरोजगारीचा भस्मासुर वाढला असून राज्यातील जनता याचा निश्चितच विचार करेल. राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेले भाजपा सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याचा घनाघाती आरोप आ. रोहित पवार यांनी केला आहे.
जिंतूर येथे युवा संघर्ष पद यात्रे निमित्त आयोजित जाहीर सभेत ते दि.२६ नोहेंबर रोजी बोलत होते. या सभेला खा.फौजिया खान, खा.संजय जाधव, आ.सुरेश वरपूडकर, आ.राहुल पाटील, आ.संदीप क्षिरसागर, माजी आ.विजय भांबळे, प्रेक्षा भांबळे, रोहित पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. पवार म्हणाले की, भाजपाच्या काळात देशात बेकारी वाढली असून स्पर्धा परीक्षेच्या नियुक्त्या, पोलीस भरती, शिक्षक भरती प्रक्रिया रखडली आहे. शेतक-यांचे प्रश्नही प्रलंबित असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहे. शासनाने शेतक-यांच्या मदतीसाठी घाईगडबडीत मदतीचे आदेश काढल्याने त्याचा सर्व शेतक-यांना फायदा झाला नाही. परभणी जिल्हा हा दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आला होता. हा मुद्दा विरोधी पक्षाच्या आमदारांनी लावून धरल्याने जिल्ह्याचा समावेश दुष्काळ यादीत करण्यात आला. भारताने ऑस्ट्रेलिया मधून कापूस आयात केल्याने कापसाचे दर घटले. गेल्या वर्षीचा पीकविमा अजून शेतक-यांना मिळालेला नाही. विम्याची अग्रीम रक्कम सप्टेंबर अखेरीस शेतक-यांना देने गरजेचे होते. परंतु राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावर शेतक-यांना दोन, चार हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली.
शेतक-यांना चार पट रक्कम मिळाली पाहिजे. त्यात बागायती व फळबाग शेतक-यांचाही समावेश करण्यात यावा. जिल्ह्याचे पालकमंत्री कधीच जिल्ह्यात येत नाही. बीड मध्ये मराठा-ओ बी सी वाद वाढविण्यात येऊन जाणून बुजून नागरिकांच्या दुकानाला आगी लावण्यात आल्या. त्या ठिकाणी तब्बल सहा तास पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. वेळीच कठोर भूमिका घेतली असती तर एवढे नुकसान झाले नसते असेही आ. पवार म्हणाले. ही संघर्ष यात्रा ३५ मुद्द्यावर आधारित निघाली असून मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठींबा आहे. राज्य व केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. या वेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, तालुका अध्यक्ष मनोज थिटे, रमेश दरगड, पृथ्वीराज भांबळे, अविनाश मस्के यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
सर्व जण भाजपात गेल्यावर शाहू होतात : खा. संजय जाधव
केंद्र सरकारने युवकांची दिशाभूल करण्याचे काम केले असून प्रचंड बेरोजगारी, महागाई, शेतक-यांचा शेतमालाला भाव नाही. परंतु केंद्र सरकार व राज्यातील खोके सरकारने याकडे साफ दुर्लक्ष करून इडी, सिबीआयचा वापर करून दबाव आणला जात आहे. भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन किंवा सोबत सत्तेत घेऊन काम करत आहेत. त्यामुळे पूर्वी चोर असलेले सर्वजण भाजपात जाऊन शाहू होत असल्याची टीका खा.संजय जाधव यांनी यावेळी बोलताना केली.
सरकारला विचार आणि निष्ठा राहिली नाही : माजी आ. भांबळे
सध्याच्या सरकारला सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाचे काही देणे घेणे राहिले नाही. केवळ समासमाजात कसे तेढ निर्माण करता येईल याकडे लक्ष दिले जात आहे. सध्या तालुक्यातील शेतक-यांना गंभीर दुष्काळग्रस्त जाहीर करणे गरजेचे असताना केवळ दुष्काळी परिस्थिती असा समावेश केला असल्यामुळे सरकारने केवळ शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. तिघाडी सरकारला आपले विचार आणि निष्ठा राहिली नसल्याचे माजी आ. विजय भांबळे यांनी यावेळी सांगितले.