नाशिक : नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडाजवळ असलेल्या शितकडा धबधब्यावर रॅपलिंगसाठी गेलेल्या एका पर्यटकांच्या तुकडीवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास हा सारा प्रकार घडला असून हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी काय परिस्थिती होती यासंदर्भातील व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हल्ल्यामध्ये एकूण २० ते २५ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दुर्गम जंगलामध्ये ३५० फूट उंचीचा शितकडा धबधबा आहे. कल्याणमधील एका संस्थेच्या माध्यमातून या धबधब्यावर मागील तीन महिन्यांपासून साहसी खेळांचे आयोजन केले जात आहे.
अशाच एका गटाला घेऊन आयोजक रविवारी या धबधब्यावर पोहोचले होते. कल्याण, गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यातील काही लोकांचा समावेश असलेला गिर्यारोहकांचा हा गट रविवारी दुपारपर्यंत शितकडा धबधबा परिसरामध्ये साहसी खेळांच्या उद्देशाने पोहोचले. धबधब्यावरून वॉटरफॉल रॅपलिंग करण्याची तयारी सुरू असतानाच या ठिकाणाच्या निरीक्षणासाठी आयोजकांकडून ड्रोन उडवण्यात आल्याने मधमाशांचे एक मोठे मोहोळ उठले आणि या मधमाशांनी या गटावर हल्ला केला.