मुंबई : मुंबईतील चेंबूरमधील सिध्दार्थ कॉलनी परिसरातील एका दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीचा तळमजला दुकान म्हणून आणि वरचा मजला निवासस्थान म्हणून वापरला जात होता. तळमजल्यावर असलेल्या दुकानातील विद्युत वायरिंग आणि इतर उपकरणांमध्ये आग लागली आणि नंतर वरच्या मजल्यावर पसरली, यात सात जणांचा मृत्यू झाला.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली. यानंतर आगीत होरपळलेल्या कुटुंबीयांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. झोन ६ चे डीसीपी हेमराज सिंग राजपूत म्हणाले, आम्हाला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. दुकान तळमजल्यावर होते आणि कुटुंब वरच्या दोन मजल्यांवर राहत होते. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. आमचे पथक आणि अग्निशमन दलाचे पथक या घटनेचा तपास करत आहे आणि आग कशी लागली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती राजपूत यांनी दिली.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यामध्ये गीता देवी गुप्ता (६० वर्षे), अनिता गुप्ता (३९ वर्षे), प्रेम गुप्ता (३० वर्षे), मंजू प्रेम गुप्ता (३० वर्षे), विधि गुप्ता (१५ वर्षे), नरेंद्र गुप्ता (१० वर्षे) आणि प्रेसी गुप्ता (६ वर्षे) यांचा समावेश आहे. आगीच्या कारणाचा तपास पोलिस करत आहेत.