आनंद : वृत्तसंस्था
अमूल दुधाचा ब्रॅँड जगभर आपला झेंडा रोवत निघाला आहे. चालू वर्षीच्या मार्च महिन्यापासून अमूलचे दूध अमेरिकेत उपलब्ध झाले. अमूल मिल्कने देशाबाहेर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ होती. अमेरिकेतील यशस्वी पदार्पणानंतर आता युरोपमध्येही अमूलचे दूध उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता जगभर अमुलचे दुध पिले जाणार आहे.
अमूलने या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये अमेरिकेत प्रवेश करीत दुधाचे चार प्रकार लाँन्च केले होते. यामध्ये अमूल फ्रेश, अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल स्लिम अँड ट्रिम यांचा समावेश होता. यासाठी अमूलने मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनसोबत भागीदारी केली होती. ही अमेरिकेची १०८ वर्षे जुनी डेअरी सहकारी संस्था आहे.
दूध केवळ आरोग्य सुधारत नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही सुधारणा घडवून आणते. बहुतेक ग्रामीण लोकांसाठी दूध उत्पादन हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसाय क्षेत्राचे योगदान ५ टक्के आहे. सुमारे 8 कोटी शेतकरी या व्यवसायाशी निगडीत आहेत. पुढील ५ वर्षांत देशातील दुग्धव्यवसायात १५ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येईल. अनेक डेअरी संबंधित स्टार्टअप्सही उत्कृष्ट काम करत आहेत.
८० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय
अमूलला त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून दरवर्षी प्रचंड उत्पन्न मिळते. मार्च २०२४ ला संपलेल्या आर्थिक वर्षात अमुलची वार्षिक उलाढाल सुमारे ८० हजार कोटी रुपये होती. अमूलचे देशभरात १०७ डेअरी प्लांट आहेत. ब्रँड ५० हून अधिक उत्पादने विकतो. दररोज ३१० लाख लिटर दूध अमुल शेतक-यांकडून गोळा करतो. देशभरात दरवर्षी अमूलची सुमारे २२ अब्ज पॅकेट विकली जातात. ३५ लाखांहून अधिक शेतकरी या अमुलशी थेट जोडले गेले आहेत.