चंदिगड: वृत्तसंस्था
हरियाणा विधानसभा निवडणूक निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. कालपर्यंत येथे काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, ९० विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपाने आघाडी घेतली असून ४९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे.
दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीत एग्झिट पोल्सनीही काँग्रेसच्या पारड्यात स्पष्टपणे बहुमत पडेल, असे सांगितले होते. तसेच काँग्रेसचे नेतेही सरकार आल्याप्रमाणे थेट मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा करत होते. मात्र आता मतमोजणीत प्राथमिक फे-यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ९० विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपाने आघाडी घेतली असून ४९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. बहुमताचा आकडा ४६ असल्यामुळे भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून सुरू केलेला जल्लोष थांबविला आहे.
एग्झिट पोल्सनी काँग्रेसला बहुमतापेक्षाही अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सध्या काँग्रेस केवळ ३६ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नवी दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयाबाहेर सकाळपासून जल्लोष सुरू होता. मात्र भाजपाने आघाडी घेतल्यानंतर जल्लोष थांबविण्यात आला आहे. तसेच काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी माध्यमांशी बोलताना फार उत्साह दाखविला नाही. आम्ही आशावादी आहोत. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ माहिती अपडेट करत नाही. तीच माहिती वापरून माध्यमे बातम्या देत आहेत. पण आमच्या कार्यकर्त्यांकडून जी माहिती मिळत आहे, त्यानुसार आम्ही पुढे आहोत , असे सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.
दुसरीकडे हरियाणात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी भाजपा तिस-यांदा सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही १० वर्षांत बरीच विकासकामे केली आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सुरू केलेल्या विकासकामांना चालना दिली.