मुंबई : बळिराजा संकटात आणि मुख्यमंत्री प्रचारात मग्न, आज त्यांची खरी गरज शेतक-यांना आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या तेलंगणा दौ-यावरून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. शेतक-यांवर अस्मानी संकट कोसळलेले असताना स्वत:ला गरीब शेतक-यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले आहेत. बळिराजाला वा-यावर सोडून दुस-या राज्यात जायला लाज नाही वाटत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, पावसाने मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे द्राक्ष आणि कांद्यांचे नुकसान झाले आहे. सरकारमुळे कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आले होते. यंदा महाराष्ट्रात दुष्काळही आहे आणि आता अवकाळी आहे त्यामुळे राज्यावरचे संकट काही कमी होत नाही. काल एक शेतकरी मंत्र्यांना म्हणाला की तुम्ही मदत करणार असाल तर भेटायला या नाहीतर निघून जा. महाराष्ट्र उघडा पडलाय, गारपीट झाली आहे, शेतक-याची वाताहात झाली आणि तुम्ही तेलंगणात प्रचाराला जाता, लाज नाही वाटत..आणि मग स्वत:च्या पंचतारांकित शेतीबद्दल सांगता. हवामान खात्याने इशारा दिला होता की, या काळात अवकाळी पाऊस पडेल मग सरकारने काय केले?
इतर राज्यांच्या निवडणुकांत रेवड्या उडवतात
धनंजय मुंडे म्हणाले होते की दिवाळीच्या आधी जर पीक विमा रक्कम दिली गेली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही, मग काय झालं त्याचं? शेतकरी बिचारा रात्रीबेरात्री वीज नाही म्हणून शेतात पाणी द्यायला जातो आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत आपली सत्ता वाचवायला जातात. भाजपचे रेवडीवाले इतर राज्यांच्या निवडणुकांत रेवड्या उडवत राहतात मग आमच्या राज्यात कधी घोषणा करणार? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केला आहे.