लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक उपकेंद्रात महिला आरोग्य सेविका नेमण्याच्या दृष्टीने नुकतीच ६३ आरोग्य सेविका व १८ आरोग्य सेवकांची पदे समुपदेशनाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने भरली आहेत. त्यामुळे जिल्हयातील उपकेंद्रात ग्रामीण भागात लसीकरण, महिलांना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट होण्यास मदत होणार आहे.
आरोग्य उपकेंद्रातील प्रत्येक गावात बालकांचे लसीकरण करणे, आरोग्य विषयक सर्वेक्षण करणे, कुटूंब कल्याणच्या संदर्भाने गावात जनजागृती करण्याचे काम आरोग्य सेविका करतात. लातूर जिल्हयात २५२ आरोग्य उपकेंद्र आहेत. तसेच ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या ठिकाणी आरोग्य सेविका व आरोग्य सेवक सेवा बजावत असतात. मात्र जिल्हयात २४६ आरोग्य सेविकांची व १०५ पुरूष आरोग्य सेवकांची पदे रिक्त होती.
ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने आरोग्य सेविका व आरोग्य पुरूष यांच्या गेल्यावर्षी परीक्षा घेतल्या होत्या. या सर्वांची प्रवर्गानुसार व गुणवत्तेनुसार यादी लावून आक्षेप मागण्यात आले होते. त्यानंतर पात्र ६३ आरोग्य सेविका व उपलब्ध २१ पैकी १८ आरोग्य सेवक यांची समुपदेशनाने नुकतीच भरली आहेत. तीन उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून नियुक्ती दिली जाणार आहे.