18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र२ प्रशिक्षणार्थी अग्निवीरांचा मृत्यू

२ प्रशिक्षणार्थी अग्निवीरांचा मृत्यू

देवळाली कॅम्पमधील घटना तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात

नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षणा दरम्यान झालेल्या स्फोटादरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. तोफेचा बॉम्बगोळा फुटल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

देवळाली कॅम्प आर्टिलरी फिल्ड फायरिंग रेंज याठिकाणी अग्नीविरांची टीम तोफ चालविण्याचे प्रशिक्षण घेत असताना इंडियन फिल्ड गनद्वारे (तोफ)
बॉम्बगोळा डागत असताना झालेल्या स्फोटात दोन अग्निवीर गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. तर एक अग्निवीर जखमी असून लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. गोहिल विश्वराज सिंग (वय २०), सैफत शीत (वय २१ दोघे रा. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) अशी मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीरांची नावे आहेत.

नाशिक शहरात देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरीचे शिंगवेबहुला फायरिंग रेंज आहे. अग्निवीर नाशिकरोड तोफखाना केंद्रात भरती होऊन तेथे त्यांचे लष्करी प्रशिक्षण सुरू आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अग्निविरांची एक तुकडी शिंगवे बहुलाला फायरिंग रेंज या ठिकाणी तोफेचा सराव करण्यासाठी गेलेली होती. यावेळी इंडियन फिल्ड गन क्र-४ मधून अग्निवीरांच्या चमूने बॉम्बगोळा फायर केला असता त्याचा तोफेजवळ स्फोट झाला. यामुळे बॉम्बचे शेल उडून या अग्निवीरांच्या शरीरात शिरले. तिघा जखमींना तात्काळ लष्करी अधिकारी व जवानांनी देवळाली कॅम्प हॉस्पिटलमध्ये लष्करी वाहनातून हलविले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी गोहिल व सैफत यांना तपासून मृत घोषित केले. याबाबतची खबर देवळाली कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलमध्ये असलेले हवालदार अजित कुमार यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात कळविली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आर्टिलरीकडून माहिती नाही
याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक पी.एस देवरे करीत आहे, अशी माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी आर्टिलरी च्या जवानांनी दोघांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले होते. शवविच्छेदन केल्यानंतर जवानांनी अग्निवीरांचे मृतदेह नाशिकरोड आर्टिलरी सेंटर येथे हलविले. याबाबत आर्टिलरी सेंटरकडून अधिक कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR